पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या घोषणेमुळे ईशान्य भारतामध्ये लोकांना वस्तू विनिमय पद्धतीवर अवलंबून राहावे लागते आहे. अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागांमध्ये सुट्ट्या पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील अनेक लोकांनी दैनंदिन व्यवहारांसाठी वस्तू विनिमय पद्धतीचा वापर सुरू केला आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने आणि सुट्ट्या पैशांची कमतरता असल्याने अरुणाचल प्रदेशातील अनेक गावांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. ‘अरुणाचल प्रदेशातील बहुतांश लोकांकडे पाचशे आणि हजारच्या फारशा नोटा नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जाताना लोकांना पैशांची गरज भासते,’ अशी माहिती तिराप जिल्ह्याचे माहिती अधिकारी देंघांग बोसाई यांनी दिली आहे. ‘सुट्ट्या पैशांची उपलब्धता कमी असल्याने दुर्गम भागातील लोकांनी वस्तू विनिमय पद्धतीचा वापर सुरू केला आहे,’ असे बोसाई यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील यंत्रणांनी चलनाच्या वाटपासाठी वाहनांचा वापर सुरू केला आहे. दुर्गम भागात पोहोचण्यासाठी या वाहनांचा वापर करण्यात येतो आहे. एसबीआयच्या स्थानिक शाखांमध्ये लोकांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. चीन आणि म्यानमारच्या सीमेलगत असणाऱ्या अन्जॉमध्ये नोटांची अतिशय कमतरता आहे.

‘अन्जॉ जिल्ह्यात फक्त एक एसबीआयची शाखा आहे. हवाईमध्ये असणाऱ्या या शाखेत पैसे जमा करण्यासाठी लोकांना बराच प्रवास करावा लागतो. हवाईमधील बँकेच्या शाखेत येण्यासाठी लोक शेअर टॅक्सीने १०० किलोमीटर प्रवास करतात. मात्र बँकेत रोख रक्कम नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागते,’ अशी माहिती अन्जॉचे अतिरिक्त उपायुक्त हेज रुजा यांनी दिली आहे. हवाईमध्ये फक्त एक एटीएम केंद्र आहे. मात्र पैसेच नसल्याचे हे एटीएम गेल्या आठवड्याभरापासून बंद आहे.

अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागांमध्ये नोटा पोहोचण्यात बराच वेळ लागणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यातील बरेचसे भाग चांगल्या रस्त्यांनी जोडले गेलेले नाहीत. ‘या भागांमध्ये हवाई मार्गाने नोटा पोहोचवण्याचा विचार आधी आमचा विचार होता. मात्र हे शक्य नसल्याने आता आम्ही रस्त्यांच्या माध्यमातून या भागात नोटा पोहोचवल्या जातील,’ अशी माहिती एसबीआयचे उपव्यवस्थापक तिलक धार यांनी दिली आहे.