नोटाबंदीमुळे सध्या देशभरात लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या दरम्यान एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा छापल्या आहेत. मात्र चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांचे मूल्य तब्बल १४.१८ लाख कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे सध्या बाजारात मोठा चलन तुटवडा आहे. विशेष म्हणजे १४.१८ लाख कोटी रुपयांचे चलन रद्द झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या दीड लाख कोटी रुपयांच्या नोटांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. मात्र लोकांकडे सुट्टे पैसेच नसल्याने २ हजार रुपयांच्या नव्या नोटा वापरण्यावर बंधने येत आहेत. क्रेडिट स्विस रिसर्च रिपोर्टच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

रिझर्व्ह बँकेने दीड लाख कोटी रुपये नुकतेच चलनात आणले आहेत. याशिवाय आधीच २.२० लाख कोटी रुपये चलनात आहेत. नोटाबंदीनंतर पाचशे आणि हजार रुपयाच्या २,२०३ कोटी नोटा चलनातून बाद झाल्या. क्रेडिट स्विस रिसर्च रिपोर्टच्या अहवालानुसार देशातील चलन पुरवठा सुरळीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला लवकरत १ ते २ हजार कोटी नोटा लवकरात लवकर छापाव्या लागतील. अन्यथा व्यवहारांमध्ये मोठे अडथळे येतील.

बँक आणि एटीएमच्या माध्यमातून १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान १.०३ लाख कोटी रुपये लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. १४.१८ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. यातील सहा लाख कोटी रुपये देशभरातील विविध बँकांमध्ये जमा झाले आहेत. क्रेडिट स्विस रिसर्च रिपोर्टच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँकेकडून दर दिवशी ५०० रुपयांच्या जवळपास ४ ते ५ कोटी नोटा छापल्या जात आहेत. या वेगाने छपाई सुरू राहिल्यास जानेवारी २०१७ पर्यंत चलनातून रद्द झालेल्या नोटांच्या मूल्यांच्या तुलनेत ६४ टक्के रक्कम पुन्हा चलनात येऊ शकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. ३१ डिसेंबरपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची सूचना पंतप्रधान मोदींकडून करण्यात आली. ३१ डिसेंबरनंतर पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा या केवळ कागदांचे तुकडे असतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद यांना रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते.