नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवा करावरुन (जीएसटी) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. नोटांबदी आणि जीएसटी हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे घोटाळे असून असून आम्ही सत्ताधाऱ्यांसमोर झुकणार नाही. या पेक्षा तुरुंगात जाणे आम्ही पसंत करु असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही अन्यायाविरोधात मतदान केले. देशाच्या हितासाठी मतदारांनी भाजपला साथ देऊ नये आणि जनतेच्या बाजूने उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या शेजारी राष्ट्रांसोबत केंद्र सरकारने संबंध बिघडवले असा आरोपही त्यांनी केला. याचा फटका भारताला बसला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), गुप्तचर यंत्रणा कुठे आहेत, सीमा रेषा सर्वांसाठी खुल्या आहेत. मग रॉ, आयबी या यंत्रणा काय करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ममता बॅनर्जी या गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर तिखट शब्दात टीका करत आहेत. पश्चिम बंगालमधील राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात वाद झाला होता. केशरीनाथ त्रिपाठी यांनी धमकी दिली होती. त्यांनी माझा अपमान केल्याचेही ममतांनी म्हटले होते. नॉर्थ परगणामधील दंगलीवरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.