नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदी शायरीचा आधार घेत  राहुल गांधींनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

नोटाबंदीला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले असून काँग्रेसने या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे सरकारवर टीका केली. नोटाबंदी ही एक आपत्ती आहे. आम्ही या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोट्यवधी प्रामाणिक भारतीयांच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणताही विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी एका हिंदी शायरीचा दाखला देत सरकारला इशाराच दिला. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ ही शायरी त्यांनी ट्विट केली. नोटाबंदीनंतर रांगेत थांबलेल्या आणि रडणाऱ्या वृद्धाचा फोटो त्यांनी या शायरीसोबत ट्विट केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी वर्षभूरापूर्वी रिझर्व्ह बँकेला डावलून आणि मंत्रिमंडळांनाखोलीत डांबून नोटाबंदीसारखा निर्णय जाहीर केला. यामुळे असंघटित कामगार आणि छोटे उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले, असा आरोप त्यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी हा लेख लिहीला आहे.