पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयास आज (बुधवारी) एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधक आक्रमक झाले असून बुधवारी देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार आज काळा पैसाविरोधी दिवस साजरा करणार आहे.नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करतानाच दोन हजारच्या नवीन नोटा चलनात आणण्याची घोषणा त्यांनी केली होती. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, असा दावा सरकारने केला. बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. त्यामुळे बँकांबाहेर सर्वसामान्यांनी रांग लावली होती. नोटाबंदीनंतरच्या ४२ दिवसांत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने ५४ वेळा नियमांत बदल केला. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडत होती.

नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. जीडीपीतही लक्षणीय घसरण झाली. नोटाबंदीच्या निर्णयावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. नोटाबंदीपूर्वी १५. ४४ लाख कोटी रुपयांच्या पाचशे आणि हजारच्या नोटा चलनात होत्या. यातील ९९ टक्के बाद चलन बँकांत परत आले. त्यामुळे नोटाबंदीमुळे खरंच काळा पैसा बाहेर आला का असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस आणि विरोधी पक्ष आज ‘काळा दिवस’ पाळणार आहेत. भाजपही हा दिवस ‘काळापैसाविरोधी दिवस’ म्हणून पाळणार आहे. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीत राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

LIVE UPDATES :

* मुंबईत नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषद, नोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज: गडकरी

* विविध राज्यांमध्ये केंद्रीय मंत्री घेणार पत्रकार परिषद, नोटाबंदीचे फायदे सांगणार

* वाराणसीत भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला काळा पैसाविरोधी दिवस

* छत्तीसगडमध्ये नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

* काँग्रेसचे कार्यकर्ते मंगळवारी रात्रीच आक्रमक झाले होते. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर रात्री उशीरा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.