‘काळ्या पैशामुळे जागतिक मंदी असतानाही भारतीय अर्थव्यवस्था तरुन गेली,’ असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. ‘काळा पैसा निर्माण होऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली असताना काळ्या पैशाच्या समांतर अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था वाचली, असे अर्थतज्ञ म्हणतात,’ असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले आहे.

‘माझा काळ्या पैशाला विरोध आहे. मला काळा पैसा नको आहे,’ असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. इंडो-म्यानमार-थायलंड फ्रेंडशिप कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अखिलेश यादव यांनी काळ्या पैशाबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर मोठी गर्दी पाहायला मिेळते. यावर भाष्य करताना अखिलेश यांनी काळ्या पैशाविषयी वादग्रस्त विधान केले.

ज्या सरकारने गरिबांना त्रास दिला, त्या सरकारला लोकांनी घरचा रस्ता दाखवला आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ‘या सरकारने सामान्य माणसाला प्रचंड मनस्ताप दिला आहे,’ अशी टीका यादव यांनी केली आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्याने काळ्या पैशाला आळा बसणार नाही, असे मत यावेळी अखिलेश यांनी व्यक्त केले. ‘भ्रष्टाचाराला आळा घालणे चांगले आहे. याविषयी लोकांना जागरुक करणे हेदेखील चांगले आहे. मात्र फक्त पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आणून हा प्रश्न सुटणार नाही. पूर्वी पाचशे आणि हजाराची नोट बैहिशेबी पैसा म्हणून साठवणारे लोक आता दोन हजारांच्या नोटांची वाट पाहात आहेत,’ असे अखिलेश यांनी म्हटले आहे.

पाचशे आणि हजाराच्या नोटा सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये आणि औषधांच्या दुकानांमध्ये वापरता यायल्या हव्यात, अशी मागणी अखिलेश यादव यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडे केली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत ही मुदत देण्यात यावी, असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले होते. ‘पाचशे आणि हजाराच्या नोटांवर अचानक बंदी आणली गेल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करुन खासगी रुग्णालये आणि औषधांच्या दुकानांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत पाचशे आणि हजार रुपये वापरण्याची परवानगी द्यावी,’ असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते.