केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. जयपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत १३५ नवीन नियम जाहीर केले असून, पंतप्रधान मोदी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिव्हर्स बँक ऑफ इंडिया केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तेराशे कोटींची संपत्ती जाहीर करणारा गुजरातचा उद्योजक महेश शहा याच्याशी आर्थिक संबंध असल्याचे भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी उघड करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

यावेळी सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना २००० रुपयांच्या नव्या नोटेशी केली. पंतप्रधान मोदी हे दोन हजाराच्या नव्या नोटेसारखे आहेत. ते ‘कलरफुल्ल’ आणि सुंदरही दिसतात. पण काम अजिबात करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहारा आणि बिर्लाकडून कोट्यवधी रुपये मिळालेले आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. पंतप्रधान मोदींनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आयकर विभागाने भाजपच्या बँक खात्यांवरही छापे टाकावेत. नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे समर्थनही केले. नोटाबंदी आणि इतर मुद्द्यांवरून काँग्रेसतर्फे येत्या ६ जानेवारीला देशभरात निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. लोकसभेत नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पळ का काढला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.