केंद्र सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या पंधरवड्यात देशभरातील जनधन खात्यांमधील ठेवींमध्ये तब्बल ३० पटींनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर केवळ १४ दिवसांत या जनधन खात्यांमध्ये तब्बल २१ हजार कोटी इतकी प्रचंड रक्कम जमा झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या अंदाजानुसार ९ नोव्हेंबरपासून जनधन खात्यामध्ये आठवड्याला जमा होणाऱ्या पैशाचा ओघ ३२०० टक्क्यांनी वाढला आहे. ३१ मार्च ते ९ नोव्हेंबर या कालावधीत जनधन खात्यात आठवड्याला जमा होणारी रक्कम ३११ कोटी इतकी होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांच्या सरासरीनुसार हा आकडा १०,५०० कोटींवर गेला आहे. साधारणत: बँकांमध्ये इतकी मोठी रक्कम जमा होण्यास वर्षाचा कालावधी लागतो. मात्र, नोटांबदीच्या निर्णयामुळे फक्त १५ दिवसांतच इतक्या मोठ्याप्रमाणावर पैसा बँक खात्यांमध्ये जमा झाला आहे.

देशभरात जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक पैसा जमा होण्यात पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही दोन राज्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये जनधन खात्यांमध्ये मोठा पैसा जमा झाल्याचे आढळून आले होते. अनेक बँकांच्या पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून या अचानक जमा होणाऱ्या पैशाच्या नोंदी ठेवण्याचे कामही बँकेतर्फे केले जात असून त्यावर प्राप्तिकर खात्याची नजर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्येक गरीब व्यक्तीचेदेखील बँकेत खाते असावे या हेतूने ‘जनधन’ योजना आणली. या योजनेनुसार कोल्हापुरात राष्ट्रीय तसेच सहकारी बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात नवीन खाती तयार करण्यात आली. या सर्व खात्यांना ‘झिरो बॅलन्स’ची सुविधा देण्यात आलेली आहे.

aa
यातील बहुतांश खात्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून कुठलाही व्यवहार झालेले नाही. त्यातील बहुसंख्य खाती ही शून्य पैसे शिलकीची होती. दरम्यान ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर गेल्या दोन- चार दिवसांतच प्रधानमंत्री जनधन योजना, जनसुरक्षा योजना या खात्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर पैसा जमा होऊ लागला आहे. जिल्ह्यात या खात्यांत काही कोटी रुपये भरले गेले आहेत. या खात्यावर अचानकपणे मोठय़ा प्रमाणात पैसे जमा होऊ लागल्याची सरकारनेही दखल घेतली असून या खात्यांवर विशेष लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.