नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जवळपास दोन वर्षांनी प्रमुख बँकर उदय कोटक यांनी टीका केली असून काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष दिलं गेलं असतं, तर नोटाबंदीचा चांगला परिणाम झाला असता असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी चलनात 2000 च्या नोटा आणण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आर्थिक क्षेत्रासाठी नोटाबंदीचा निर्णय एक आर्शिवाद असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक असणारे उदय कोटक यांनी म्हटलं आहे की, छोट्या कंपन्या सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. पुढे बोलताना त्यांनी, या क्षेत्राकडे सरकार योग्य लक्ष दिलं जात असल्याच सांगत कौतूक केलं.

नोटाबंदीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, योग्य पद्धतीने धोरण आखलं असतं तर निकाल थोडा वेगळा असता. ‘मला वाटतं जर काही साध्या गोष्टींकडे लक्ष दिलं असतं, तर येणारा निकाल वेगळा असता. जर तुम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा काढून घेत आहात तर मग 2000 रुपयांची नोट आणण्याची काय गरज होती’, असा प्रश्न उदय कोटक यांनी उपस्थित केला आहे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

‘अंमलबजावणीचा भाग म्हणून योग्य मूल्य असणाऱ्या नोटांची संख्या वाढवणं किंवा उपलब्ध करुन देणं गरजेचं होतं. जर अशा काही गोष्टींची काळजी घेतली गेली असती तर आज आपण वेगळ्या पद्धतीने या मुद्द्यावर चर्चा करत असतो’, असं उदय कोटक यांनी म्हटलं आहे.

मात्र टीका करताना त्यांनी नोटाबंदीचा निर्णय आर्थिक क्षेत्रासाठी आशिर्वाद ठरला असल्याचं म्हटलं. ‘आर्थिक बचतीमध्ये अविश्वसनीय वाढ झाली असून यामुळे जोखीम व्यवस्थापनाला आव्हान मिळालं आहे. मला वाटतं छोट्या आणि मध्यम व्यवसायांनी खूप त्रास सहन केला असून, अद्यापही त्यांच्यासमोर मजबूत होण्याचं आव्हान कायम आहे’, असं ते बोलले आहेत.