पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदीबाबू हे प्लॅस्टिक मनीचे विक्रेते (सेल्समन) बनले आहेत. मात्र, लोक प्लॅस्टिक खाणार का?, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जी सध्या  मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात आता अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांचा आधार घेतला होता. देशाला वाचवण्यासाठी राष्ट्रहिताचे सरकार स्थापन करण्याची गरज असून या सरकारचे नेतृत्व अडवाणी, जेटली किंवा राजनाथ सिंह या तिघांपैकी एकाने केले पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीत मोदींनी पायउतार व्हावे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती.

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासह डावे पक्ष आणि काँग्रेस आघाडीवर आहेत.  नोटाबंदीचा निर्णय हा रिझर्व्ह बँकेचा नसून सरकारच्या ‘सूचने’वरून घेण्यात आल्याची बाब उघड झाल्याने या विरोधात आणखीनच भर पडली आहे. ‘पाचशे रुपये व एक हजार रुपये चलनातून काढून घेण्याचा निर्णय सर्वतोपरी आमचाच होता’, असे रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे आजवर सांगण्यात येत होते; तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकारही तसाच दावा करीत होते. मात्र, खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थविषयक संसदीय समितीपुढे याबाबतचा अहवाल सादर केला असून, ‘मोदी सरकारने केलेल्या ‘सूचने’मुळेच आम्ही हा निर्णय घेतला’, अशी कबुली बँकेने त्यात दिली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दाव्यातील विसंगती उघड झाली आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँकेचा नव्हता, हे सिद्ध झाले आहे. हे म्हणजे वैयक्तिकरित्या काढलेले तुघलकी फर्मान आहे, अशी टीका माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली. आर्थिक घोटाळ्यात सुदिप्तो बंडोपाध्याय या आपल्या खासदारास पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणून तृणमूल काँग्रेसचा सध्या थयथयाट सुरु आहे. नोटाबंदीवरुन टीका केल्याने मोदी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप तृणमूलने केला होता.