नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात निर्माण झालेल्या ‘अर्थ’कल्लोळावर स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी नागरिकांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या काही दिवसांत बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना ५० आणि २० रूपयांच्या नोटाही दिल्या जातील याची त्यांनी ग्वाही दिली आहे. दक्षिण भारतातील बँकांच्या शाखांमध्ये लोकांची गर्दी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. गरजेच्या वेळी पैसे मिळतील हा लोकांना विश्वास प्राप्त झाल्याचे यावरून लक्षात येते, असे भट्टाचार्य यांनी म्हटले. एटीएममधून लवकर पैसे संपत असल्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, एटीएममध्ये १०० च्या नोटा ठेवण्याची मर्यादा आहे. त्याचबरोबर नव्या नोटांचा आकार बदलला आहे. नव्या नोटांप्रमाणे साचा बनवण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे. ही अडचण नोव्हेंबरच्याअखेर संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर हा गोंधळ कमी झाला तर येत्या काही दिवसांत आम्ही ५० आणि २० च्या नोटा ही देण्यास सुरूवात करू.

दुसरीकडे रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गर्व्हनर यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती एटीएमवर लक्ष ठेवेल. दरम्यान अर्थ सचिव शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. काही लोक बँकेतून किंवा एटीएममधून दिवसभरात वारंवार पैसे काढत असल्यामुळे विनाकारण गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बँकांमध्ये असणाऱ्या मर्यादित चलनसाठ्यामुळे इतर लोकांनाही पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे बँकेच्या कॅश काऊंटरवर एखाद्या व्यक्तीने व्यवहार केल्यानंतर त्याच्या हाताच्या बोटावर मतदानाप्रमाणे शाईची खूण करण्यात येईल, अशी माहिती दास यांनी दिली. आजपासून देशातील बहुतांश शहरातील बँकांमध्ये ही पद्धत लागू केली जाणार असल्याचेही दास यांनी सांगितले. मीठासंबंधीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याकडे सरकारचे लक्ष असून सोशल मिडीयामधील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे दास यांनी सांगितले.