नोटाबंदीमुळे घरांच्या किमती कमी झाल्या असून, त्यामुळे युवकांना घरे घेणे परवडू लागले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केला. जर मागील सरकारच्या गतीने आम्ही काम केले असते तर आता जेवढी स्वस्त घरे आम्ही बांधली आहेत, ती बांधायला २५ वर्षे लागली असती, असेही ते म्हणाले. सुरत विमानतळाच्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, की नोटाबंदीचा काय फायदा झाला असे मला विचारण्यात येते, हा प्रश्न तुम्ही युवकांना विचारा, कारण ते आता घरांच्या किमती कमी झाल्याने घरे विकत घेऊ शकतात. बांधकाम व्यवसायात काळा पैसा वापरला जात होता, पण नोटाबंदी व रेरा कायद्याने आम्ही त्याला लगाम घातला आहे.

हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, की आता विमान प्रवास करणे सामान्यांच्या आवाक्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा विकास होईल.

एनडीएच्या गेल्या चार वर्षांच्या राजवटीत त्यांच्या सरकारने १.३० कोटी घरे बांधली, पण यूपीएच्या काळात केवळ २५ लाख घरे बांधली गेली. गेल्या तीस वर्षांत देशाने त्रिशंकू संसदच पाहिली, त्यामुळे विकास होत नव्हता. गेल्या चार वर्षांत आम्हाला मिळालेल्या बहुमताचा पुरेपूर फायदा देशाला करून दिला, विकास कामे धडाक्याने केली. पूर्ण बहुमत असलेले सरकारच विकास कामे अशा पद्धतीने करू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.