News Flash

५० दिवसानंतर मोदी राजीनामा देणार की तोंड लपवत फिरणार ?- लालूप्रसाद यादव

कॅशलेस अर्थव्यवस्थेचा आधार घेत आश्वासनापासून पळू नका

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (संग्रहित)

नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती ५० दिवसांमध्ये न सुधारल्यास नरेंद्र मोदी राजीनामा देणार का, असा प्रश्न राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी उपस्थित केला आहे. ‘नोटाबंदीमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पन्नास दिवसानंतरदेखील ही परिस्थिती कायम राहिल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार का ?,’ असा सवाल लालू प्रसाद यांनी केला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांची मुदत मागितली होती. त्यातील २२ दिवस अजून शिल्लक आहेत. ५० दिवसांमध्ये देशातील स्थिती पूर्ववत झाली नाही, तर मोदी राजीनामा देणार की तोंड लपवत फिरणार ?’, असा प्रश्न लालू प्रसाद यांनी विचारला आहे. ट्विटरच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले आहे.

‘पंतप्रधान मोदी कॅशलेस अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत त्यांच्या आश्वासनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. ‘देशात सध्या ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण फक्त २०% आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कॅशलेस होणे शक्य नाही,’ असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधान, मंत्री, आर्थिक सल्लागार, निती आयोग यांपैकी कोणालाच ग्रामीण भागाची समज नाही. त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्न समजतील, ही अपेक्षाच चुकीची आहे,’ असेही लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.

लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. मात्र लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दलाने नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांनी काळ्या पैशांविरोधात उचलेल्या पावलाचे काही दिवसांपूर्वी कौतुक केले होते. मात्र नितीश यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी नोटाबंदीमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासावरुन सरकारला धारेवर धरले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. मोदींच्या या निर्णयाला महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप तरी देशातील स्थिती पूर्ववत झालेली नाही. देशातील जवळपास ९५% एटीएमचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मात्र यातील फक्त ३५% एटीएममध्ये रोकड उपलब्ध आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने साडे पंधरा लाख कोटी रुपये चलनातून बाद झाले. मात्र तितक्याच प्रमाणात नवे चलन व्यवहारांमध्ये न आल्याने देशामधील चलन कल्लोळ कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 3:25 pm

Web Title: demonetisation will pm modi quit if cash woes continue lalu prasad
Next Stories
1 रामदेवबाबा म्हणाले, ‘हे’ असतील पतंजलीचे उत्तराधिकारी!
2 जयपूरमध्ये चित्र प्रदर्शनात लाल-सेनेचा धुडगूस, चित्रांची केली नासाडी
3 काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो लोकांच्या आत्महत्या, मग राहुल गांधी उपदेश देणारे कोण? : नायडू
Just Now!
X