पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका देशभरातील नागरिकांना बसतो आहे. अगदी पिंडदानाच्या विधीवरदेखील सरकारच्या निर्णयाचे परिणाम पाहायला मिळत आहेत. सुट्ट्या पैशांच्या टंचाईचा परिणाम पिंडदानासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येवर झाला आहे. मात्र पिंडदानासाठी येणाऱ्या लोकांना पंडितांकडून सहकार्य केले जाते आहे.

‘नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य दिले जाते आहे,’ असे बिहारमधील गयामध्ये आलेल्या एका भाविकाने म्हटले आहे. ‘आम्ही पिंडदानासाठी येणाऱ्या लोकांना शक्य तितकी मदत करत आहोत. सुट्ट्या पैशांची टंचाई असल्यामुळे आम्ही पिंडदानासाठी कोणतीही दक्षिणा आकारत नाही,’ अशी माहिती पंडितांनी दिली आहे.

हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्यात आल्याने सध्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. जुन्या नोटा बदलून देताना बँकेने दोन हजाराची नोट दिल्यास पुन्हा सुट्ट्यांचा प्रश्न लोकांसमोर उभा राहतो आहे. याचा मोठा फटका पिंडदानाच्या विधीला बसतो आहे. त्यामुळे काही पंडितांकडून पिंडदानाचा विधी मोफत करुन दिला जातो आहे.

८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. मोदींच्या या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. याशिवाय एटीएम केंद्रांबाहेरदेखील मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.