नोटाबंदी हे विचारपूर्वक केलेले एक क्रूर षड्यंत्र होते. हा एक गंभीर घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटा-बुटातील मित्रांसाठी काळा पैसा पांढरा करण्याची ही स्कीम आहे, अशी खोचक टीका ट्विटच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

नोटाबंदी हे मोदींच्या बड्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. संपूर्ण विचारपूर्वक केलेले हे एक कांड असून त्यामध्ये काहीही देशहित नव्हते. नोटाबंदीचे समर्थन करताना केलेली ही कृती म्हणजे देशाच्या भल्याचा विचार असल्याचे सांगणे हा देशाचा अपमान असल्याचेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अचानक नोटाबंदी जाहीर केली होती. यामध्ये देशभरात चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी ८५ टक्के नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदी केलेल्या या नोटा ५०० आणि १००० रुपये मुल्याच्या चलनी नोटा होत्या. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा फायनान्शिअल स्ट्राइक असल्याचे त्यावेळी मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागले होते. अनेक छोट्या रोजगारांवर तसेच छोट्या व्यावसायांवर त्याचा विपरित परिणाम पहायला मिळाला होता. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली होती की, जितक्या एकूण मुल्याच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या त्याच्या ९९ टक्के मुल्याची रक्कम बँकेत परत आली आहे.

दरम्यान, नोटाबंदीवरुन काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर कठोर टीका केली आहे. नोटाबंदीचा ८ नोव्हेंबर हा दिवस गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस काळा दिवस म्हणून पाळत आहे.