हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर बलात्कार करून जाळल्याच्या प्रकरणी दिल्लीत जंतरमंतर येथे सोमवारी काही लोकांनी एकत्र जमून आंदोलन केले, त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. एकूण ४०-५० जण आंदोलनात सहभागी होते. त्यांच्या हातात ‘वुई वाँट जस्टीस’ व ‘हँग दी रेपिस्ट’ असे लिहिलेले फलक होते.

दिल्लीतील जंतरमंतर येथे  निषेध आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या अमृता धवन यांनी सांगितले की, मी राजकारणी म्हणून नव्हे तर नागरी समुदायाची सदस्य म्हणून या आंदोलनाचे आयोजन करीत आहे. समाजात जे वाईट चालले आहे त्याची आपल्याला चिंता वाटते. निर्भया प्रकरणानंतरही आज महिला समाजात असुरक्षित आहेत हेच हैदराबादच्या घटनेतून दिसून आले आहे. न्याय व्यवस्थेने जलद न्याय देऊन अशा अनेक पीडित महिलांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा.  दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणातील गुन्हेगार तुरुंगात आहेत, त्यांना फाशी देण्यात आलेले नाही. ते तुरुंगात व्यवस्थित जीवन जगत आहेत. ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा वेदना कायम आहेत.

दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजची विद्यार्थिनी आदिती पुरोहित हिला निषेधाच्या घोषणा देत असताना रडू कोसळले. मी घरापासून दूर दिल्लीत राहते. त्यामुळे हा प्रश्न मला माझ्याशीही निगडित वाटतो, असे तिने सांगितले.

दरम्यान, गेल्या महिन्यात तेलंगण  राज्यात महिला तहसीलदारास जाळून ठार मारल्याच्या घटनेवेळी तिला वाचवण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांपैकी एका जखमीचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

महिला आयोग अध्यक्षांचे आज उपोषण

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांबाबत विरोध दर्शवण्यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल या मंगळवारपासून दिल्लीत बेमुदत उपोषण करणार आहेत. मालीवाल या जंतरमंतरवर उपोषणाला बसतील.