नवऱ्याने एसी नसलेल्या रुममध्ये झोपायला सांगितले म्हणून चिडलेल्या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुजरातच्य अहमदाबाद शहरात ही घटना घडली. आम्हाला खासगी रुग्णालयातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असा फोन आल्याचे निकोल पोलिसांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

निकोल पोलीस रुग्णालयात पोहोचले, त्यावेळी महिलेचा मृतदेह स्ट्रेचवर ठेवण्यात आलेला होता. नवरा मृतदेहाच्या शेजारी उभा होता. “माझा दोन वर्षांचा मुलगा आजारी होता. त्यामुळे बुधवारी रात्री मी पत्नीला एसी रुममध्ये झोपू नको असे सांगितले. एसीमुळे मुलाला आणखी त्रास होऊ शकला असता, म्हणून पत्नीला दुसऱ्या रुममध्ये झोपण्यास सांगितले” असे पतीने पोलिसांना सांगितले.

‘पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीने एसी नसलेल्या रुममध्ये झोपण्यास नकार दिला. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली’ अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास काम आटोपून पत्नी मुलाला सोबत घेऊन रुममध्ये गेली. थोडयावेळाने रुममधून मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळी पती दुसऱ्या मजल्यावरील रुमच्या दिशेने धावत आला. पण रुम आतमधून बंद होती. लॉकतोडून आत प्रवेश केला त्यावेळी मूल रडत होते आणि पत्नीने साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेतला होता.”