एखाद्या वस्तूचा तुटवडा असल्यास दर वाढतात, पण एखादी वस्तू मुबलक असूनही महागडी असणे हे जरा आश्चर्यच. जगातील सुखी राष्ट्र म्हणून गणल्या जाणाऱ्या डेन्मार्कमध्ये पाणी मुबलक असले तरी अन्य राष्ट्रांच्या तुलनेत सर्वात महाग आहे.

सुमारे साडेपाच कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या डेन्मार्कमध्ये पाण्याचा विपुल साठा आहे. बहुतांशी पाणी हे भूगर्भातील वापरले जाते. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये प्रति क्युबिक मीटर पाण्यासाठी आठ डॉलर एवढा दर पडतो. भारतीय चलनात ५०० रुपयांच्या आसपास हा पाण्याचा दर आहे. भरपूर पाणी असतानाही एवढे महागडे पाणी नागरिकांना खरेदी करावे लागते. आखाती राष्ट्रांमध्ये पाणी महाग असले तरी तेथे मुळात पाणीच पुरेसे नाही. याउलट डेन्मार्कमध्ये भरपूर पाणी असूनही ते महागडे आहे. जगात डेन्मार्कमधील पाणी सर्वात महागडे असल्याचे ‘डॅनिश वॉटर फोरम’चे संचालक मॉर्टन रिस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

एकही कर्मचारी नाही

आरहुस शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘आरहुस वांड’ कंपनीच्या वतीने शहराच्या बाहेर पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे. एवढा मोठा प्रकल्प असला तरी एकही कर्मचारी तेथे तैनात करण्यात आलेला नाही.

महापौरांचा विरोध, पण जनतेचीच पसंती

भारतात पाणी किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्यावर प्रथम राजकारणी त्याला विरोध करतात. कारण त्यात मतांचे राजकारण असते. विरोधकांनी आवाज उठविल्यावर सत्ताधाऱ्यांनाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. हे झाले भारतातील. पण डेन्मार्कमध्ये नेमका उलटा अनुभव आला. आरहुस या शहरातील पाणीपुरवठा करण्याचे काम ‘आरहुस वांड’ या खासगी कंपनीच्या वतीने केले जाते. या शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीने मध्यंतरी पाण्याच्या दरात वाढ केली. साहजिकच राजकारण्यांकडून विरोध झाला. विशेष म्हणजे शहराच्या महापौरांनी दरवाढीचा फेरविचार करण्याची सूचना कंपनीला केली. चांगली सेवा किंवा स्वच्छ पाणी पाहिजे असल्यास दरवाढ अपरिहार्य असल्याचा युक्तिवाद कंपनीच्या वतीने करण्यात आला. विशेष म्हणजे कंपनीच्या आवाहनानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला दरवाढ मान्य आहे, अशी भूमिका मांडली. महापौरांना मेल पाठविण्यात आले. लोकांनीच अनुकूल भूमिका मांडल्याने दरवाढ झाली. बुलूंड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीनेही स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊनच धोरण राबविल्याचे कंपनीच्या अधिकारी व मूळच्या बंगळुरूच्या चित्रा राजू यांनी सांगितले.