शस्त्रक्रिया करताना डॉक्टर काहीवेळा शस्त्रक्रियेची एखादी वस्तू रुग्णाच्या शरीरात विसरुन जातात. नंतर काही दिवसांनी जेव्हा रुग्णाला त्रास होऊ लागतो तेव्हा स्कॅनिंगच्या चाचणीतून ती वस्तू शरीरात राहिल्याचे लक्षात येते. असाच प्रकार कर्नाटकातल्या धारवाडमध्ये घडला आहे. दातांच्या डॉक्टरकडून झालेली ही चूक सुदैवाने महिलेच्या जीवावर बेतली नाही.

हा दातांचा डॉक्टर उपचारानंतर शस्त्रक्रियेची सुई महिलेच्या जबडयामधून काढायला विसरला. महत्वाचं म्हणजे उपचार घेणारी महिला सुद्धा स्वत:हा दातांची डॉक्टर आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर सारीका या आपल्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर विनायर महेंद्रकर यांच्या एसपी रोडवरील खासगी क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी डॉक्टर महेंद्रकर सारीकाच्या जबडयामधून सुई काढायला विसरले.

काही दिवसांनी सारीकाच्या जबडयाकडच्या भागामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या. तिने क्लिनिकमध्ये जाऊन एक्स रे काढला. त्यावेळी डॉक्टर महेंद्रकर यांनी जबडयामधून सुई काढलीच नसल्याचे तिच्या लक्षात आले. ज्यावेळी सारीकाने डॉक्टर महेंद्रकर यांना याबद्दल सांगितले त्यावेळी त्यांनी आपल्या चुकीबद्दल कुठलाही खेद व्यक्त केला नाही. त्यांनी ही बाब खूप सामान्यपणे घेतली व सारीका यांना दुसऱ्या दिवशी क्लिनिकवर येण्यास सांगितले.

ज्यावेळी सारीका दुसऱ्या दिवशी क्लिनिकवर पोहोचल्या त्यावेळी तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे संतापलेल्या सारीकाने थेट पोलीस स्थानक गाठून महेंद्रकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना समोरासमोर बसवले व प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा सल्ला दिला. आपल्या जबडयामधून सुई काढावी एवढीच सारीकाची मागणी होती जी महेंद्रकर यांनी मान्य केली. त्यामुळे या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल न होता सामोपचाराने हा वाद मिटला.