करोना साथीमुळे अमेरिकेतील ज्या विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत त्या विद्यापीठांच्या परदेशी विद्यार्थ्यांची मायदेशी रवानगी केली जाणार आहे. अमेरिकेतील भारतीय आणि इतर परदेशी विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आणणारा निर्णय ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतर विभागाने घेतला आहे.

परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहून शिकायचे असेल तर जिथे ऑनलाइन शिक्षण नाही अशा संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. जर परदेशी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण नसलेल्या संस्थांत प्रवेश घेतला नाही तर त्यांना देशातून परत पाठवण्यात येईल, असे  स्थलांतर विभागाने म्हटले आहे. ज्या संस्थांत संमिश्र शिक्षण आहे तेथे या विद्यार्थ्यांना तीन श्रेयांक तासांपैकी एकवर्ग ऑनलाइन करता येईल. त्यामुळे त्या संस्थांना नेमके किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेतात याची प्रमाणपत्रे जारी करावी लागणार आहेत. या निर्णयामुळे भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांत नैराश्याचे वातावरण पसरले आहे. करोना साथीमुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंध कडक केले आहेत त्याचाच हा भाग असला तरी त्यामागची कारणमीमांसा समजू शकलेली नाही.

आदेशात काय?

२०२०च्या उन्हाळ्यात अमेरिकेत सुरू असलेल्या शैक्षणिक सत्रात जी विद्यापीठे संपूर्णऑनलाइन वर्ग चालवणार आहेत त्यांच्या परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्यात येईल. त्यांना अमेरिकेत राहून ऑनलाइन अभ्यास करता येणार नाही. पूर्णपणे ऑनलाइन शिक्षण असलेल्या विद्यापीठातील ज्या परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तसेच जे सध्या त्यांच्या मायदेशात आहेत त्यांना अमेरिकेत येऊ दिले जाणार नाही, त्यांना तसा व्हिसाच जारी केला जाणार नाही, असे स्थलांतर अंमलबजावणी कार्यालयाने म्हटले आहे.

परिणाम किती?

अमेरिकेत जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना अभ्यासासाठी एफ १ व्हिसा दिला जातो. तर एम १ व्हिसा व्यावसायिक व इतर अशैक्षिणक संस्थांत प्रवेश घेणाऱ्यांना दिला जातो. यात भाषा प्रशिक्षण कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा समावेश नसतो. भारत (२५१२९०), चीन (४७८७३२) याप्रमाणे २०१७-१८ मधील विद्यार्थ्यांची संख्या आहे. भारताच्या विद्यार्थ्यांची संख्या २०१७-२०१८ दरम्यान ४१५७ ने वाढली आहे.