सहा महिन्यांत सरकारी बँकांच्या तुलनेत अधिक ठेवी

संदीप सिंग, एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : बँकांमधील ठेवींबाबत ठेवीदारांचा कल बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत ठेवीदारांनी आपला पैसा सरकारी बँकांऐवजी खासगी बँकांमध्ये ठेवण्यास पसंती दिल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या या बँकांच्या तिमाही आर्थिक अहवालांच्या विश्लेषणात आढळले आहे.

जुलै ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यासह आघाडीच्या ८ खासगी बँकांमधील ठेवी २.६८ लाख कोटी रुपयांनी वाढल्या. याच कालावधीत आघाडीच्या ८ सरकारी बँकांच्या ठेवींमधील २.५८ लाख कोटी रुपयांच्या वाढीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. त्याआधीच्या सहा महिन्यांत मात्र वेगळे चित्र होते. जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत भारतीय स्टेट बँक व पंजाब नॅशनल बँक यांच्यासह आठ सरकारी बँकांमध्ये ५.२५ लाख कोटींच्या ठेवी जमा झाल्या होत्या. याच सहा महिन्यांत खासगी क्षेत्रातील ८ बँकांमध्ये २.५३ लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या होत्या.

२०१९ या वर्षांत ८ सरकारी बँकांमधील एकूण ठेवी ६६.७३ लाख कोटी होत्या. या तुलनेत आघाडीच्या ८ खासगी बँकांमधील ठेवी ३०.९९ कोटी रुपये होत्या. याचाच अर्थ, बँकांमधील एकूण ठेवींपैकी दोन तृतीयांश ठेवी सरकारी बँकांमध्ये आहेत. या विश्लेषणासाठी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक, बंधन बँक व आयडीएफसी फर्स्ट बॅंक या खासगी बॅंकांसह भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या सरकारी बॅंकाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे.

नव्या ठेवींपैकी जवळजवळ ८० टक्के ठेवी खासगी बँकांनी मिळवल्या असल्याचे गेल्या सहा महिन्यांतील वाढीव ठेवींचे प्राथमिक विश्लेषण केले असता लक्षात येते, असे रिझव्‍‌र्ह बँकेतील सूत्रांनी सांगितले. सरकारी बँकांनी जमा केलेल्या नव्या ठेवींचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अर्थ समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

जानेवारी- जून २०१९ या कालावधीत आठ सरकारी बँकांनी जमा केलेल्या अतिरिक्त ठेवींपैकी २३ टक्के ठेवी स्टेट बँकेच्या होत्या; मात्र त्यानंतरच्या सहा महिन्यांत हाच वाटा ६३ टक्क्य़ांपर्यंत वाढला. ८ सरकारी बँकांकडे जमा झालेल्या अतिरिक्त ठेवींपैकी स्टेट बँक व पीएनबी यांचा मिळून ७८.५ टक्क्य़ांचा वाटा आहे.

सर्वाधिक वाढीव ठेवी एचडीएफसीमध्ये

खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये वाढीव ठेवींचा सर्वाधिक वाटा एचडीएफसी बँकेचा असून, त्याखालोखाल आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचा क्रमांक आहे. जुलै ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एचडीएफसी बँकेने १.१२ लाख कोटींच्या ठेवी जमा केल्या; तर या दोन बँकांनी आपल्या ठेवींमध्ये अनुक्रमे ५५,६१३ कोटी व ५०,९९८ कोटी रुपयांची भर घातली. आठ खासगी बँकांनी जमा केलेल्या ठेवींपैकी ८२ टक्क्य़ांचा वाटा या तीन बँकांचा होता.