काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभ मेळ्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाची स्तुती करत त्यांचा पाय धुवून सन्मान केला होता. पंतप्रधानांनी कर्मचाऱ्यांना खुर्चीवर बसवून त्यांचे पाय धुतले होते. त्यानंतर त्यांना अंगवस्त्रही दिले होते. परंतु नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी अगदी विरोधी कृती केली. एका व्हिडीओमध्ये राजीव कुमार हे खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत. तर एक कर्मचारी त्यांना बूट घालताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ धनबाद येथील आहे. नीति आयोगाचे उपाध्यक्ष आणि अन्य अधिकाऱ्यांची एक टीम मुनीडीह येथील कोळसा खाणीच्या पाहणीसाठी जात होती. परंतु या दौऱ्यापूर्वी राजीव कुमार यांनी स्वत: बूट घालण्याऐवजी एका कर्मचाऱ्याकडून बूट घालून घेतले. काही काळानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नीति आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आता ते यावर काय कारवाई करतील हे पहावे लागेल.