बिहारमधील रालोआच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी राज्यपाल फगू चौहान यांची भेट घेतली आणि राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला.

शपथविधी समारंभ सोमवारी होणार असल्याचे नितीशकुमार यांनी राज भवनाहून निवासस्थानी परतल्यानंतर वार्ताहरांना सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी हेच उपमुख्यमंत्री असतील का, अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे या वेळी नितीशकुमार यांनी टाळले.

पाठिंब्याचे पत्र सुपूर्द

राज्यातील रालोआच्या चारही घटक पक्षांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आले. राज्यपालांच्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी शपथविधी समारंभ होणार आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाईल आणि त्या बैठकीत विधानसभेच्या अधिवेशनाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही नितीशकुमार म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीत जदयूपेक्षा जास्त जागा पटकावल्या असल्याने भाजपने मंत्रिमंडळात जास्त प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी केली आहे का, या प्रश्नाला नितीशकुमार यांनी उत्तर देण्याचे टाळले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांच्याबाबत विचारले असता, सर्व काही ठीक होईल, असे ते म्हणाले.

सुशील मोदी हे नितीशकुमार यांच्यासोबत राज भवनावर गेले नाहीत, पक्षाचे निरीक्षक आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासमवेत ते राज्य अतिथीगृहात गेल्याने सुशील मोदी यांच्याऐवजी अन्य नेत्याला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. नितीशकुमार हे राज भवनाहून परतल्यानंतर राजनाथसिंह आणि मोदी यांनी राज्यपालांची भेट घेतली, त्यामुळे मोदी यांच्या राज्याच्या राजकारणातील भवितव्याबाबतच्या चर्चेलाही उधाण आले होते.

कटिहारचे आमदार तारकिशोर प्रसाद यांची विधानसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड करण्यात आली, असे राजनाथसिंह यांनी वार्ताहरांना सांगितले. सुशील मोदी हेच उपमुख्यमंत्री असतील का, असे विचारले असता राजनाथसिंह यांनी, याबाबतचा निर्णय योग्य वेळी कळेल, असे सांगितले.

तारकिशोर प्रसाद, रेणू देवी उपमुख्यमंत्री?

पाटणा: भाजपने कटीहारचे आमदार तारकिशोर प्रसाद यांची बिहार भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. तर रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाली आहे. या दोघांनाही उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. कटीहारमधून सलग चौथ्यांदा विजयी झालेले ५२ वर्षीय प्रसाद हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. बिहारच्या राजकीय वर्तुळात ते फारसे चर्चेत नसतात. त्यांची गटनेतेपदी निवड आश्चर्यकारक मानली जात आहे. तर उपनेतेपदी निवड झालेल्या रेणू देवी या नोनिया या अतिमागास समाजातील असून, बेतिह मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत. २०१० मध्ये त्यांनी नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवले आहे.

जागावाटपातील विलंबाचा फटका : तारीक अन्वर

नवी दिल्ली : बिहारमध्ये जागावाटपातील विलंबाचा विपरीत परिणाम महाआघाडीच्या निवडणूक कामगिरीवर झाला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी  सांगितले. काँग्रेसने यापासून धडा घ्यावा आणि पुढील निवडणुकीपूर्वी आघाडीची औपचारिकता पूर्ण करावी, असेही ते म्हणाले.