कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलीय. लक्ष्मण सवादी यांनी, “ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीही केलीय. “जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो,” असं सवादी म्हणाले आहेत.

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  “सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर काही तासांमध्येच सवादी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलीय.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद हा मागील अनेक दशकांपासून सुरु आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ट्विटरवरुन हा वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात परत घेण्यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या ट्विटरवरुन हेच ट्विट केल्याने वाद निर्माण झाला. अजित पवारांच्या ट्विटला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी उत्तर देताना, “कर्नाटकने महाराष्ट्राला एक इंचही जमीन देण्याचा प्रश्नच नाही. या नेत्यांनी केवळ राजकीय कारणांसाठी वक्तव्य करणं बंद करावं”, असा टोला लगावला होता.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय. वादग्रस्त भूभाग हा महाराष्ट्राच्या मालकीचा असून तो महाराष्ट्राला परत मिळाला पाहिजे असं सावंत म्हणाले आहेत. बेळगाव, निप्पाणी, कारवार या भागामध्ये मराठी भाषिक लोकसंख्या अधिक आहे. यावरुनच ही जमीन महाराष्ट्राची असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही जमीन महाराष्ट्राला देण्यात यावी, असं सावंत यांनी म्हटलं आहे.