ललित मोदी प्रकरणावरील चर्चा नियम ५६ अंतर्गत घेण्याची आणि त्यावर मतदानाची मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर कॉंग्रेसच्या सदस्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांच्यासमोर कागद फाडून भिरकावल्याने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ललित मोदी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी तहकुबीची नोटीस दिली होती. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावरच लोकसभा अध्यक्षांनी ती मागणी फेटाळली होती. या विषयावर चर्चा करण्यास सत्ताधारी तयार असल्यामुळे दुपारी या विषयावर चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, नियम ५६ प्रमाणेच चर्चा करण्यात यावी, अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. सरकारने दिलेल्या प्रस्तावानुसार नियम १९३ अंतर्गत चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
सुमित्रा महाजन यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावत सत्ताधारी पक्षाने दिलेल्या प्रस्तावानुसारच चर्चा घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, कॉंग्रेसच्या सदस्यांनी थेटपणे त्याला नकार देत पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीला अर्धा तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.