अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळय़ाचे डोके उडवून ते एका हातात धरले आहे व दुसऱ्या हातात रक्ताने माखलेला चाकू आहे, असे मुखपृष्ठ चित्र जर्मनीच्या ‘डेर श्पिगेल’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले असून. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या साप्ताहिकाने त्यांच्या अंकाच्या मुखपृष्ठावर अमेरिकी-क्युबन कलाकार व राजकीय शरणार्थी एडेल रॉड्रिग्यूझ याने काढलेले चित्र प्रसिद्ध केले आहे. साप्ताहिकाचे मुख्य संपादक क्लॉस ब्रिंकबॉमर यांनी सांगितले, की आम्ही अमेरिकी अध्यक्ष स्वातंत्र्यदेवीचा शिरच्छेद करतात असे चित्र प्रसिद्ध केले आहे. याच अमेरिकेने १८८६ पासून शरणार्थीचे व स्थलांतरितांचे स्वागत केले होते. ‘बाइल्ड’ या टॅब्लॉइडने ट्रम्प यांची तुलना थेट ब्रिटिश नागरिक व जिहादी जॉन महंमद इमवाझी याच्याशी केली आहे. जिहादी जॉनने अनेक ओलिसांना कापून काढले होते. बाइल्डशी बोलताना युरोपीय पार्लमेंटचे उपाध्यक्ष अलेक्झांडर ग्राफ लॅम्बस डॉर्फ यांनी सांगितले, की हे चित्र अभिरुचिहीन आहे. ‘डाय वेल्ट’ या वृत्तपत्राने स्पिघेलवर पत्रकारितेचे अवमूल्यन केल्याची टीका केली, तर फ्रँकफुटर अ‍ॅलेगेमीन झेटुंग या नियतकालिकाने अशी चित्रे प्रसिद्ध केल्याने ट्रम्प यांचे दानवीकरण होऊन त्यांचाच फायदा होईल. नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांच्या विजयानंतर स्पिघेलने ट्रम्प यांना आकाशातून पृथ्वीवर पडलेल्या धूमकेतूच्या रूपात दाखवले होते. हा लोकशाहीचा शिरच्छेद आहे व त्यामुळेच पवित्र स्वातंत्र्यदेवीचा शिरच्छेद चित्रात दाखवला, असे रॉड्रिग्यूझ यांनी ‘दी वॉशिंग्टन’ पोस्टला सांगितले. इस्लामच्या दहशतवादी कल्पना व ट्रम्प यांची मूलतत्त्ववादी धोरणे त्यात काहीच फरक नाही. दोन्ही अतिरेकीच आहेत. मी केवळ त्यांची तुलना केली आहे असे त्यांनी सांगितले.