बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला करोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव तीन दिवसांपूर्वी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल आलं होतं. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डेरा प्रमुख दोन महिला अनुयायांसोबत केलेल्या बलात्कारप्रकरणी २०१७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

गुरमीत राम रहीमला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. त्यावर औषधोपचारही सुरु आहे. दरम्यान ३ जूनला पोटात दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने तात्काळ पीजीआय रोहतक रुग्णालयाात दाखल केलं. दोन तास तपासणी केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर पीजीआयने त्याला इतर चाचण्यासाठी एम्समध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र एम्समध्ये करोनामुळे चाचणी बंद असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला मेदांता रुग्णायलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिथे केलेल्या चाचण्यांमध्ये त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

एचआयव्हीग्रस्त महिलेच्या शरीरात करोना विषाणूने ३२ वेळा बदलली रचना

“गुरमीत राम रहीम याला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. यासाठी त्याला रोहतकमधील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा जाणवली नाही. त्यानंतर चाचणीसाठी मेदांता रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे चाचणी दरम्यान त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे”, असं जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.