डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत बाबा राम रहिमला त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंचकुलातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात बाबा राम रहिमने पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहिमला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत त्याला १०-१० वर्षांच्या दोन वेगवेगळ्या शिक्षा सुनावली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहिमला २८ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली होती. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेल्या राम रहिमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पंचकुला आणि हरयाणा येथे हिंसाचार उफाळला होता. यामध्ये ३८ लोकांचा मृत्यू झाला. तसेच २५० हून जास्त लोक जखमी झाले होते. आता सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बाबा राम रहिमने हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्ट बाबा राम रहिमची बाजू ऐकल्यावर आधीच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवणार की आणखी काही वेगळा निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

११०० कोटी रूपयांचे साम्राज्य उभे करणारा हा स्वयंघोषित संत सध्या तुरुंगात रोज सक्तमजुरीची कामे करतो आहे. दिवसातील ८ तास काम केल्यानंतर त्याला त्याचा मोबदला म्हणून २० रूपये मिळतात. ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तानुसार बाबा राम रहिमला सध्या भाजी लागवडीचे काम देण्यात आले आहे. दरम्यान, बाबा राम रहिमसोबत राहणारी त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. पोलीस तिचाही शोध घेत आहेत. हनीप्रीत नेपाळला दिसल्याचे समजले आहे. पोलीस त्या दृष्टीने शोध घेत आहेत.