डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. सध्या राम रहिम यांना रोहतक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर हरयाणात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. राम रहिम यांच्या अनुयायांनी हरयाणात प्रचंड हिंसाचार केला. मात्र आता हिंसाचार करण्यासाठी डेरा सच्चा सौदाकडून ‘भाडोत्री गुंडांचा’ वापर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘द ट्रिबून’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हरयाणात अक्षरश: हैदोस घातला. मात्र या हिंसाचारासाठी डेरा सच्चा सौदाने भाडोत्री गुंडांचा वापर केल्याचे समोर आले आहे. दिवसाकाठी १ हजार रुपये आणि जेवणाची सोय अशी ‘ऑफर’ देऊन डेरा सच्चा सौदाने हिंसाचारासाठी गुंड आणले होते, असे ‘द ट्रिबून’ने वृत्तात म्हटले आहे. हिंसाचारासाठी पैसे देऊन आणलेल्या सर्वांची सोय पंचकुलामध्ये करण्यात आली होती. प्रशासनासावर दबाव टाकण्यासाठी डेरा सच्चा सौदाकडून शक्ती प्रदर्शनदेखील करण्यात आले होते.

‘जेव्हा आमच्या घरात काम करणारी मोलकरीण गुरुवारी आली नाही, तेव्हा आम्ही तिच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा तिने डेराच्या अनुयायांसोबत पंचकुलाला जात असल्याची माहिती दिली. तिच्यासोबत बोलताना डेराकडून तिला पैसे देण्यात आले असल्याचे आम्हाला समजले,’ अशी माहिती सिरसातील एका व्यापाऱ्याने दिली. ‘हिसारमधील काही भागांमध्ये याबद्दल घोषणा करण्यात आली होती. जे लोक डेराच्या अनुयायांसोबत येतील, त्यांना दररोज १ हजार रुपये देण्यात येतील आणि चांगले जेवणदेखील दिले जाईल, असे डेराकडून सांगण्यात आले होते,’ अशी माहिती हिसारमधील एका सरकारी डॉक्टरने दिली. गावातील १०० हून अधिक महिला डेराच्या अनुयायांसोबत गेल्याचा दावादेखील या डॉक्टरने केला.

‘द ट्रिबून’च्या वृत्तावर डेराच्या प्रवक्त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोक स्वत:च्या इच्छेनुसार आले होते, अशी माहिती प्रवक्त्यांनी दिली. शुक्रवारी बलात्कार प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहिम यांना दोषी ठरवले. यानंतर हरयाणात मोठा हिंसाचार उफाळला. राम रहिम यांच्या समर्थकांनी राज्यभरात तोडफोड आणि जाळपोळ केली. यामध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला, तर २५० हून अधिक जण जखमी झाले. उद्या (सोमवारी) राम रहिम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राम रहिम यांना न्यायालयात आणले जाणार नाही. तर न्यायाधीशच रोहतकच्या तुरुंगात जाऊन त्यांना शिक्षा सुनावतील.