मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे काही डबे येथून जवळच रुळावरून घसरल्याने पहाटेच्या वेळी दोन प्रवासी ठार तर इतर सात जण जखमी झाले आहेत. सिकंदराबाद येथून ही गाडी निघाली होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. मधुसूदन यांनी सांगितले की, येथून २० कि.मी अंतरावर असलेल्या मारतूर स्टेशनवर पहाटे सव्वादोन वाजता ही गाडी रुळावरून घसरली. मृतांमध्ये हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पलता (वय ४०) व ज्योती (वय २८) यांचा समावेश आहे. जखमींना गुलबर्गा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य परिक्षेत्राचे रेल्वे सुरक्षा आयुक्त या अपघाताची चौकशी करतील, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल यांनी सांगितले. दुरांतोच्या अपघाताने आपल्याला दु:ख झाले असून वैद्यकीय व इतर मदत पोहोचवली जात आहे, रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना घटनास्थळी पाठवले आहे, असे प्रभू यांनी ट्विट केले आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार तर साधारण जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपये भरपाई जाहीर केली आहे. रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले की, या अपघातात कुणीही अडकून पडले नाही. रेल्वेसेवा पूर्ववत सुरू केली आहे. मधुसूदन यांनी सांगितले की, मदतकार्यात पोलीस, रेल्वे व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७०० जवानांचा सहभाग आहे. ईशान्य कर्नाटक महामार्ग महामंडळाच्या बस गाडय़ांनी प्रवाशांना त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी रवाना करण्यात आले.
रेल्वेने संपर्कासाठी गुलबर्गा ०८४७-२२५५०६६/२२५५०६७ , सिकंदराबाद ०४०-२७७००९६८, सोलापूर ०२१७-२३१३३३१, छत्रपती शिवाजी टर्मिनस ०२२-२२६९४०४०, लोकमान्य टिळक टर्मिनस ०२२-२५२८०००५, कल्याण- ०२५१-२३११४९९ या प्रमाणे दूरध्वनी क्रमांक दिले आहेत.