‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेत सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून १८ लाख युवकांना रोजगार मिळेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.  माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत देशाला पुढे नेणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
नव्या युगात सरकार व जनतेत तंत्रज्ञानाचा समन्वय साधणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत ई गव्हर्नन्स, कामकाजात पारदर्शकता व सामान्यांच्या हाती कारभार देण्याचा सरकारचा हेतू असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री, सुनील मित्तल यांच्यासह अनेक उद्योगपती या वेळी उपस्थित होते आणि त्यांनीही पंतप्रधानांप्रमाणेच अनेक घोषणांचा पाऊस पाडला.
देशात सुमारे ३० कोटी लोक इंटरनेट वापरतात. मात्र इंटरनेट न वापरणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. या सर्वांपर्यंत ही डिजिटल क्रांती पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे स्थान आघाडीचे आहे. तरीही गुगलसारखे नवोन्मेषशाली काम आपल्याकडे होत नाही. असे काम व्हावे यासाठी मी युवकांना आवाहन करतो. ‘मेक इन इंडिया’साठी ‘डिझाइन इन इंडिया’ महत्त्वाचे आहे. त्या माध्यमातून ‘डिजिटल इंडिया’ ही मोहीम यशस्वी होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक स्पर्धेतील सायबर युद्धाविषयी ते म्हणाले की, जगावर रक्तविहीन युद्धाचे ढग पसरले आहेत. रक्तविहीन युद्ध म्हणजे सायबर युद्ध. त्यासाठी सायबर सुरक्षेत भारताने मोठी मजल मारली पाहिजे. सायबर युद्ध झाल्यास केवळ एका क्लिकमध्ये कोणताही देश ठप्प होऊ शकतो.
उद्योजकांचा पुढाकार
मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिजने डिजिटल क्षेत्रात २.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. टाटा समूह ६० हजार तंत्रज्ञांची भरती करील, असे सायरस मिस्त्री यांनी जाहीर केले. भारती एन्टरप्राईजेसने येत्या पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली.