भारतात चित्रपट आणि त्यातील कलाकारांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले असतील. शेजारचा पाकिस्तानही या सगळ्याला अपवाद नाही. बॉलीवूडमधील अनेक कलाकार पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहेत. चित्रपटातील आपल्या आवडत्या कलाकाराला भेटायला मिळेल, अशी भाबडी आशा घेऊन आलेले अनेकजण मुंबईत पहायला मिळतात. मात्र, या सगळ्यांचीच इच्छा फलद्रुप होते असे नाही. अभिनेता शाहरूख खान भेटण्यासाठी भारतात येत असलेल्या एका पाकिस्तानी महिलेचे स्वप्नही अशाचप्रकारे अपूर्ण राहिले आहे. चंदा नावाची ही पाकिस्तानी महिला  समझोता एक्स्प्रेसने भारताकडे यायला निघाली होती. मात्र, चंदाकडे भारतात येण्यासाठीची वैध कागदपत्रे आणि तिकीट नसल्याने तिला पोलिसांनी जालंधर स्थानकावर उतरवले. जालंधर स्थानकावर गुरूवारी रात्री दहा वाजता हा सारा प्रकार घडला. प्रवासादरम्यान,  रेल्वे सुरक्षा दल(आरपीएफ) पोलीसांना चंदाकडे पारपत्र आणि तिकीट नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबद्दल सरकारी रेल्वे पोलीसांना (जीआरपी) कळवले. त्यानंतर जीआरपी पोलीसांनी विशेष परवानगी घेऊन जालंधर येथे समझोता एक्स्प्रेस थांबविली आणि चंदाला ट्रेनमधून खाली उतरायला लावले. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत चंदाच्या बॅगेत आवश्यक ती कागदपत्रे मिळाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, चंदाने केलेल्या दाव्यानुसार ती आपल्या मामाबरोबर प्रवास करत होती. अपत्यप्राप्तीसाठी भारतातील काही दर्ग्यांमध्ये जायचे असल्याचे यावेळी तिने सांगितले. तसेच मी बॉलीवूड स्टार शाहरूख खानची मोठी चाहती असून त्याला बघायला मुंबईला जाणार असल्याचेही चंदाने यावेळी पोलीसांना सांगितले. मात्र, चौकशीदरम्यान चंदाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पोलीसांनी दिली. त्यानंतर पोलीसांनी तिला पुन्हा पाकिस्तानात पाठवायचे ठरवले. चंदाने अटारीवरून दिल्लीला जाण्यासाठी समझोता एक्स्प्रेस पकडली होती.  त्यामुळे चंदाला पुन्हा अटारी रेल्वे स्थानकाकडे पाठविण्यात आले.