थायलंडमधील ४५ वर्षीय अविवाहित अभिनेत्रीने जीवनसाथी शोधण्यासाठी आगळावेगळा मार्ग अवलंबला. या अभिनेत्रीने बँकॉकमधील लाड फराओ परिसरात एक जाहिरात फलक लावला असून, त्यावर मोबाईल नंबरसह स्वत:चा हॉट फोटो छापला आहे. बँकॉकच्या स्थानिक माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या अभिनेत्रीचे नाव अरण्या ‘पुई’ पाथुमथॉन्ग आहे. सोशल मीडियावरदेखील तिचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. “मी कुमारी असून, एका साथीदाराच्या शोधात आहे, जो माझ्या जीवनातील पोकळी भरून काढेल” असा मजकुर फलकावर लिहिला आहे. थाई भाषेतील या जाहिरातीत “चाळीस आणि कुमारी. पुई अरण्या एका जीवनसाथीचा शोध घेत आहे. माझा मृत्यू व्हायच्या अगोदर एकदा तरी मला तो भेटावा” असे देखील लिहिले आहे. सूत्रांच्या मते, जीवनसाथीच्या शोधात असलेली अरण्या ही एक बी दर्जाची अभिनेत्री आहे. डेटिंग अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळावर तिचे शोधकार्य पूर्ण होऊ शकले नाही. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ५०० बाथचा दंड आकारत सदर जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश जाहिरात संस्थेला दिले. पोलिसांनी अरण्यालादेखील चौकशीसाठी बोलावल्याचे डेली न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.