चार दिवसांच्या मुलीची तिच्या वडिलांनीच चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गांधीनगर येथील मोती मसंग या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. या मुलीच्या वडिलांचे नाव विष्णु राठोड असे असून त्याला अटक करण्यात आली आहे. विष्णू आणि त्याची पत्नी विमला या दोघांचे लग्न १० वर्षांपूर्वी झाले. त्यांना ५ मुली आहेत. मात्र मुलगा हवा यासाठी विष्णू आग्रही होता. विमला सहाव्यांदा गरोदर राहिली, तेव्हा विष्णूला वाटले की या खेपेला तरी मुलगा होईल. मात्र मुलगी झाली. मुलगी झाल्याची बातमी समजताच विष्णू पत्नीला आणि मुलीला भेटायलाही गेला नाही.

रविवारी विष्णू पत्नीला आणि नवजात मुलीला भेटायला गेला, तेव्हा त्याने कसलाही विचार न करता चार दिवसांच्या मुलीवर चाकूचे तीन वार केले. या घटनेनंतर या चार दिवसांच्या मुलीला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. तिला रूग्णालयात आणले तेव्हा तिची अवस्था नाजूकच होती आणि तिच्या अंगावर झालेल्या जखमांमुळेच तिचा अंत झाला असे सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेनंतर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी विष्णु राठोडला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. विष्णुच्या सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांच्या मुलीवर वार करून विष्णु पळून जाण्याच्या तयारीत होता, पण माझ्या मुलीने आरडाओरड करून विष्णुने मुलीला ठार मारल्याचे सांगितले, त्यानंतर शेजाऱ्यांनी विष्णुला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकार मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून जनजागृती करत असतात. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखी महत्त्वाकांक्षी योजनाही सरकारने सुरु केली आहे. असे असूनही मुलाच्या अट्टाहासापुढे मुलीचा जीव घेणारे आई बापही समोर येत आहेत. आपल्या देशासह अनेक देशांमध्ये अगदी कोवळ्या वयातल्या मुलीपासून महिलांपर्यंत सगळ्यांनाच अन्याय, अत्याचाराचा सामना करावा लागतो. ते कमी झालेले नाहीत हेच अधोरेखित करणारी ही घटना आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.