चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देशभरातून केले जात असताना चिनी उत्पादनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला आहे. चिनीमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी याबद्दलचे वृत्त दिले आहे.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू होते. मात्र संयुक्त राष्ट्रातील भारताच्या या प्रयत्नांना चीनने खो घातला. याशिवाय चीनला पाकिस्तानकडून मोठी आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येते आहे. समाज माध्यमांवरदेखील या आवाहनाच्या पोस्ट शेअर होत आहेत. मात्र या सगळ्याचा चिनी मालाच्या विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे वृत्त ग्लोबल टाईम्सने दिले आहे.
‘दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण आहे. देशातील सर्वात मोठा सण असल्याने दिवाळीसाठी मोठी खरेदी केली जाते. ऑक्टोबरच्या अखेरीस येणाऱ्या दिवाळीसाठी सध्या भारतात जोरदार खरेदी केली जाते. मात्र याच दरम्यान चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन समाज माध्यमांवर केले जाते आहे. काही भारतीय नेत्यांकडूनदेखील चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जाते आहे. मात्र भारत सरकारने चिनी मालावर कोणतीही बंदी घातलेली नाही. त्यामुळे आजही चिनी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत’, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
‘चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला यश मिळालेले नाही. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ऑनलाईन संकेतस्थळांवर चिनी कंपन्यांची उत्पादने मोठ्या प्रमाणात विकली गेली आहेत. झिओमी या मोबाईल कंपनीने अवघ्या तीन दिवसांमध्ये फ्लिपकार्ट, ऍमेझॉन इंडिया, स्नॅपडिलवर ५ लाख मोबाईलची विक्री केली आहे’, अशी माहिती ग्लोबल टाईम्सने दिली आहे.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने सुरुंग लावला. शिवाय भारताला अणू पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) समावेश स्थान मिळू नये यासाठीही चीनने प्रयत्न केले. त्यामुळेच चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन समाज माध्यमांवर केले जात आहे.
‘दोन्ही देशांमधील संबंधांचा फटका अनेकदा चिनी उत्पादनांना बसतो. मात्र यंदा चिनी मालाची विक्री वाढली आहे. भारत आणि चीनमधील व्यापार ७०० कोटी अमेरिकन डॉलर इतका आहे. चीनमधील भारताची गुंतवणूक २०१५ मध्ये ८ हजार ७०० लाख अमेरिकन डॉलर होती. ही गुंतवणूक २०१४ च्या तुलनेत सहापट वाढली आहे’, अशी आकडेवारी ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे देशभरातून चिनी मालावर बहिष्कार करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 5:51 pm