चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील उंचावरील प्रदेशात कॅमेरा आणि टेहळणी उपकरणे तैनात केली होती. पण तरीही भारतीय सैन्य दलाच्या विशेष तुकडयांनी चीनला काही कळण्याआधीच हा भाग आपल्या ताब्यात घेतला. “चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या उंचावरील भागात अत्याधुनिक कॅमेरे आणि टेहळणी उपकरणे बसवली होती, तरी भारतीय सैन्य दलाने या प्रदेशावर ताबा मिळवला” असे सूत्रांनी एएनआयला सांगितले.
२९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण अलर्ट असलेल्या भारतीय जवानांनी चीनचा हा डाव हाणून पाडला. त्याचवेळी रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या भागातील उंचावरील प्रदेशावर ताबा मिळवला. चिनी सैन्याने संपूर्ण नियंत्रण रेषेवर अशा पद्धतीचे हायटेक कॅमेरे आणि टेहळणी उपकरणे बसवली आहेत. या माध्यमातून ते भारतीय सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवतात.
चीनचा दावा असलेल्या भागांमध्ये भारतीय सैनिक गस्त घालताना दिसले की, लगेच चिनी सैन्य तिथे येऊन पोहोचते. नियंत्रण रेषेवर बसवलेल्या कॅमेरे आणि अन्य टेहळणी उपकरणांमुळे त्यांना हे शक्य होते. भारताने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळचा उंचावरील भाग ताब्यात घेतल्यानंतर तिथून चिनी कॅमेरे आणि टेहळणी उपकरणे काढून टाकली आहेत.
हा उंचावरील भाग आपल्या हद्दीत येतो, असा चीनचा दावा आहे. रणनितीक दृष्टीने हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण इथून पँगाँग टीएसओच्या संपूर्ण दक्षिण किनाऱ्यावर तसेच स्पानगुर गॅपच्या मोकळया भागावर लक्ष ठेवता येते. उंचावरील हा भाग ताब्यात घेत असताना, चीनने कोणतीही हरकत केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारीही भारतीय सैन्याच्या विशेष तुकडीने केली होती. पूर्वअनुभव लक्षात घेता भारताने सुद्धा या भागात विशेष सैन्य वाहने, रणगाडे तैनात केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2020 11:02 am