जगभरातील शेकडो देश करोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच ज्या चीनमधून करोनाचा उद्रेक झाला तेथेच आता (कु)प्रसिद्ध अशा डॉग मीट फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. जगभरातील अनेक देशांनी चीनमध्ये प्राण्यांचे मांस खाण्याच्या परंपरेमुळे वटवाघुळाच्या मांसामधून मानवामध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप केला जात असतानाच चीनने मात्र याकडे दुर्लक्ष करत आपली हेकेखोरी सुरुच ठेवल्याचे चित्र दिसत आहे. करोनाचे सावट असतानाही येथील यूलीन डॉग मीट फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये कुत्रांना अमानुष मारहाण करुन मारले जाते आणि त्यांचे मांस शिजवून खाल्ले जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाऊ नये यासाठी प्राणी मित्रांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.

करोनाचा उद्रेक झाल्यानंतर चीनमधील सरकारकडूनही अशा फेस्टिव्हलचे आयोजन करु नये यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य आणि प्राण्यांसंदर्भातील नियम कठोर करुन यावर आळा घालण्यासंदर्भातील नियम बनवण्यापर्यंतची चर्चा चीनमध्ये सुरु आहे असं असतानाच लोकांनी मात्र याकडे दूर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार चीनच्या नैऋत्यला असणाऱ्या यूलीन शहरामध्ये डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी केलं जातं. दहा दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलच्या कालावधीमध्ये लाखो लोकं या शहराला भेट देतात. अनेकजण येथील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणारे लहान मोठ्या आकाराचे कुत्रे विकत घेऊन त्यांचे मांस खातात. करोनामुळे या वर्षी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असेल अशी आशा प्राणी मित्रांनी व्यक्त केली आङे.

“युलीनमधील लोकं केवळ प्राण्यांसाठी नाही तर स्वत:च्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी बदलतील अशी मला अपेक्षा आहे. गर्दी करुन या फेस्टिव्हलला हजेरी लावणं आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांची कत्तल करुन त्यांचे मांस सेवन करणं हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे,” असं मत पीटर ली यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केलं. ली हे ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या प्राणी मित्र संघटनेचे चीनसंदर्भातील धोरणांविषय तज्ज्ञ आहेत.

ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार दरवर्षी चीनमध्ये एक कोटी कुत्र्यांची कत्तल केली जाते. हे कुत्रे अनेकदा घरांमधील पाळीव किंवा रस्त्यांवरील भटके कुत्रे युलीन डॉग मीट फेस्टिव्हलसाठी नेले जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर मांस म्हणून वापरण्यात येणारे कुत्रे आणि पाळीव कुत्रे असे दोन प्रकार करण्याबद्दल चीन सरकार विचार करत असून लवकरच जंगली प्राण्यांच्या मांसाच्या तस्करीवर निर्बंध घालण्याबद्दल नवीन कायदे करण्याचाही विचार चीनमध्ये सुरु असल्याचे वृत्त आहे.