चीनमध्ये सत्तेत असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारकडून उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकावर सुरु असणाऱ्या अत्याचाराविरोधातील बातम्या, लेख, फोटो जगभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये सातत्याने छापून येत असतात. या उइगर मुस्लिमांवर सरकार अत्याचार करत असल्याचे अनेकदा सिद्धही झालं आहे. अनेक मानवाधिकार संघटनांनाही उइगर मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असणाऱ्या प्रदेशांमध्ये सरकारी छावण्या बांधून या मुस्लिमांवर अत्याचार केला जात असल्याचे वेगवेगळ्या अहवालात म्हटलं आहे. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उलट वक्तव्य करत अप्रत्यक्षपणे देशातील उइगर मुस्लिमांचा विकास होत असल्याचे वक्तव्य केलं आहे. शिंजियांग प्रांताच्या पश्चिमेकडे राहणाऱ्या समाजाचा विकास होत असून सरकार या भागातील लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा देत धडा शिकवत राहील असं वक्तव्यही जिनपिंग यांनी केलं आहे.  सरकारी वृत्त संस्था असणाऱ्या शिंहुआ न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शिंजियांग प्रांताचा पश्चिमेकडील भाग हा उइगर मुस्लिमांच्या वस्तीचा भागा आहे. जिनपिंग यांनी या भागाचा उल्लेख करत उइगर मुस्लिमांसंदर्भातच भाष्य केल्याचं उघड होत आहे. या भागामध्ये ८० लाख उइगर मुस्लीम राहतात. या मुस्लिमांना सुशिक्षित करण्यासाठी आणि सभ्य बनवण्याच्या नावाखाली सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या छावण्यांमध्ये क्रूरपणे त्यांचा छळ केला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आलं आहे. चीनमधील उइगर मुस्लिमांची प्रार्थनास्थळं पाडून तिथे सार्वजनिक शौचलये उभारल्याचा प्रकारही समोर आला आहे. शिंजियांगमधील विरोधकांशी वागण्याची हीच योग्य पद्धत असल्याचे पक्षाचे (सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे) मत आहे. तसेच यासंदर्भातील दिर्घकालीन धोरण आखले पाहिजे असंही पक्षाला वाटत असल्याचे जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार शिंजियांमध्ये कमीत कमी १० लाख उइगर मुस्लिमांना जबरदस्तीने काम करण्यासाठी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र चीन कायमच उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील आरोप फेटाळून लावत आहेत. शिंजियांगमध्ये चीनला विरोध करणाऱ्या विचारसरणीचा खतपाणी घातले जाते. त्यामुळेच हा विरोध मोडून काढण्यासाठी येथील लोकांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही ट्रेनिंग सेंटर उभारले आहेत. याच ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना ठेवले जाते असा दावा चीनने केला आहे. अनेकदा चीनने अशा छावण्या अस्तित्वातच नसल्याचेही म्हटले आहे. मात्र आता चीनच्या राष्ट्राध्यक्षांनीही या छावण्यांमध्ये लोकं आनंदात असून आम्ही त्यांना भविष्यातही शिक्षा देत राहू असं वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. देश, देशभक्ती आणि देशाच्या इतिहासाबद्दल त्यांना असणारी माहिती अधिक योग्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगत जिनपिंग यांनी अप्रत्यक्षपणे या छावण्यांमधील कामाचे समर्थन केलं आहे.