News Flash

खळबळजनक खुलासा ! ‘आम्हाला गुपचूप कळवा, मल्ल्याला ताब्यात घ्यायची गरज नाही’

विजय मल्ल्याला ताब्यात घ्यायची गरज नाही फक्त तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप कळवा, असे आदेश खुद्द सीबीआयनेच दिले होते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई पोलिसांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक करू नये, तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे असे आदेश सीबीआयकडून देण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या गोपनिय कागदपत्रांद्वारे हा खुलासा झाला आहे. मल्ल्याला ताब्यात घेण्याची गरज नाही, पण तो भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप माहिती द्या असे आदेश सीबीआयकडून मुंबई पोलिसांना पत्राद्वारे देण्यात आले होते.

यापूर्वी, विजय मल्ल्या याला पकडण्यासाठी सीबीआयने लुकआऊट नोटीस जारी केली होती, पण ही नोटीस कमकुवत करण्यात आली. नोटीस कमकुवत होणं हा ‘एरर ऑफ जजमेंट’चा भाग होता, असा दावा सीबीआयने केल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिलं होतं. मात्र, सीबीआयनेच मुंबई पोलिसांना विजय मल्ल्याला अटक करू नये, तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे अशा आशयाचं पत्र पाठवलं होतं, असा खळबळजनक खुलासा आता झाला आहे.

16 ऑक्टोबर 2015 रोजी काढलेल्या पहिल्या लुकआउट नोटीशीत ‘देश सोडून जाण्यास मनाई करावी’ हा रकाना भरला होता, याचाच अर्थ त्या नोटिशीनंतर मल्ल्या देश सोडू शकत नव्हता. 24 नोव्हेंबर 2015 रोजी दुसरी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यावेळी रात्री उशीरा दिल्ली विमानतळावर उतरला होता. या नोटिशीत ‘देश सोडून जाण्यास मनाई करावी या रकान्याऐवजी ‘व्यक्तीच्या येण्या/जाण्यासंदर्भात माहिती द्यावी’ हा रकाना भरला होता. म्हणजेच मल्ल्याला अटक करु नये, केवळ माहिती द्यावी असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. आणि त्याच्या चार महिन्यांनंतरच मल्ल्या देश सोडून पळाला.

23 नोव्हेंबर 2015 रोजी, मल्ल्या दिल्लीमध्ये येणार आहे याची सूचना देण्यात आली होती. त्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 तारखेला मुंबई पोलिसांना पत्र लिहून, मल्ल्याला ताब्यात घेण्याची गरज नाही, जर गरज पडली तर नंतर त्याला ताब्यात घेता येऊ शकतं, असं म्हटलं होतं. म्हणजे मल्ल्याविरोधात अलर्ट असूनही सीबीआयने काहीच माहिती नसल्याचं सोंग घेतल्याचं स्पष्ट होत आहे. या पत्रावर मुंबई सीबीआयचे एसपी हर्षिता अटलुरी यांची स्वाक्षरीही होती. तसंच मुंबई आयपीएस अधिकारी असवती दोर्जे यांनाही ही प्रत मिळाली होती. या प्रकरणावर इंडियन एक्सप्रेसने अटलुरी यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 11:34 am

Web Title: detention of vijay mallya not required cbi put in writing to mumbai police
Next Stories
1 ‘प्रसिद्धीविनायक मोदीं’च्या व्यंगचित्रावरून राज ठाकरे ट्रोल
2 रेवाडी बलात्कार : महिला पोलीस अधिकारी निलंबीत, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची छापेमारी
3 व्हॉट्स अॅप ग्रुपवर निर्मला सीतारामन यांची हत्या करण्यासंदर्भात चॅटिंग, दोघांना अटक
Just Now!
X