केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी बुधवारी जोरदार टीका केली. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही थेट योजना आखली नाही, असे देवेगौडा म्हणाले. शेतकऱ्यांबाबत मोदी सरकारने घेतलेल्या उपाययोजनांसंदर्भात आपण समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोदी यांनी कोणताही थेट कार्यक्रम हाती घेतला आहे असे आपल्याला वाटत नाही, असेही माजी पंतप्रधान म्हणाले.
सरकारने ज्या काही योजना हाती घेतल्या आहेत त्याचा अल्प मुदतीसाठीही लाभ होणार नाही, या बाबत आपण मोदींशी चर्चा केली आहे, मात्र त्यांनी याचे उत्तरच दिलेले नाही, असेही देवेगौडा म्हणाले. देवेगौडा एलडीएफच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे आले आहेत. सबसिडीचे थेट हस्तांतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असेही ते म्हणाले. मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्री जोरदार प्रचार करीत आहेत, मात्र त्यांचा राज्य विधानसभेत शिरकाव होईल का ते माहिती नाही, असे देवेगौडा म्हणाले.