आपण आणलेले किराणा सामान तसेच चलनी नोटा निर्जतुक करण्यासाठी रोपड येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी एक निर्जतुकीकरण पेटी तयार केली आहे.

करोना विषाणूच्या प्रसारामुळे बाहेरून आणलेले पदार्थही निर्जतुक करण्याची विशेष गरज निर्माण झाली आहे.  आयआयटीच्या मते ही पेटी व्यावसायिक वापरात आली तर तिची किंमत पाचशे रुपयांपर्यंत कमी ठेवता येईल. या यंत्राच्या मदतीने बाहेरून आणलेला भाजीपालाच नव्हे  तर चलनी नोटाही निर्जतुक करता येतात.

रोपड आयआयटीचे वैज्ञानिक नरेश राखा यांनी सांगितले, की सध्या अनेक जण भाजीपाला निर्जतुक करण्यासाठी तो गरम पाण्याने धूत आहेत. पण चलनी नोटांना तर काही करता येत नाही त्यामुळे त्यावर जंतू राहू शकतात. त्यामुळे निर्जतुकीकरण पेटी तयार केली आहे,

उपयोग काय?

या यंत्रात पैशांचे पाकिट, चलनी नोटा, भाज्या, दुधाच्या पिशव्या, मनगटी घडय़ाळ, मोबाईल फोनसह कोणतीही कागदपत्रे निर्जतुक करता येतात. ही निर्जतुकीकरण पेटी जंतूंना मारणाऱ्या अतिनील किरणांचा मारा करू शकणाऱ्या प्रारूण तंत्रज्ञानावर आधारित आहे. या पेटीतील प्रकाशाकडे थेट डोळ्यांनी पाहू नये, त्यामुळे इजा होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.