प्रत्येकासाठी विकास हेच सरकारचे उद्दिष्ट असून तोच आपल्या सरकारचा धर्म आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिरुअनंतपूरम येथे स्पष्ट केले.

विकास आणि उत्तम कारभार याला जात, धर्म, लिंग अथवा भाषा माहिती नसते, असेही मोदी म्हणाले. ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडले, त्या वेळी ते बोलत होते.

प्रत्येकासाठी विकास हाच ‘सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास’ यांचे सार आहे, विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे, विकास हाच आमचा धर्म आहे, असेही ते या वेळी म्हणाले आणि त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणाचा समारोप केला. मोदी यांनी ५,०७० कोटी रुपयांचा पुगलूर-थ्रिसूर ऊर्जा पारेषण प्रकल्प देशाला समर्पित केला.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील  शांतिनिकेतन येथे पंतप्रधान मोदी म्हणाले की, उच्चशिक्षित आणि कुशल व्यक्ती जगात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवत आहेत, तर अन्य काही जण जनतेला करोनाच्या संकटातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहेत. आपण समस्येचा भाग व्हावयाचे की तोडग्याचा, हे विद्यार्थ्यांनी ठरवावे.

विद्यार्थ्यांना आवाहन

विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात मोदी म्हणाले की, या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुढील २५ वर्षांसाठी २५ सूत्री कार्यक्रमाची रूपरेषा आखावी. ती रूपरेषा देशातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी अनुकरणीय असेल.