महाविकास आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. कर्नाटकात शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार हेगडे म्हणाले, “केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले.”

“तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. त्याचे हे उत्तर आहे, असेही हेगडे यांनी म्हटले आहे.