भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी मोलकरणीस देत असलेल्या वेतनाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आले असले, तरी त्यात अनेक परस्परविरोधी प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे मत भारतीय वंशाच्या एका अमेरिकी वकिलाने व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील वकील रवि बत्रा यांनी असे म्हटले आहे, की संघराज्य अधिवक्ता प्रीत भरारा यांनी जे आरोप खोब्रागडे यांच्यावर ठेवले आहेत ते केवळ मोलकरीण संगीता रिचर्ड यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केले आहेत. प्रत्यक्षात संगीता रिचर्ड या नवी दिल्ली येथे अमेरिकी दूतावासात मुलाखतीसाठी गेल्या तेव्हा त्यांनी चुकीची माहिती दिली. १२ डिसेंबर रोजी खोब्रागडे यांना या प्रकरणात हातकडय़ा घालून अटक करण्यात आली होती व त्यानंतर भारताने अमेरिकेच्या भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांवर अनेक बंधने घातली होती.
बत्रा यांनी सांगितले, की संगीता रिचर्ड या स्वत:हून खोटे बोलल्या व त्यांच्या इच्छेनुसार तीन करार केले. पहिला करार तोंडी स्वरूपाचा व नंतरचे दोन लेखी स्वरूपाचे होते. त्यात महिना ३० हजार रुपयांचा उल्लेख आहे. त्यानंतर संगीता यांनी अमेरिकी दूतावासात दोनदा मुलाखती दिल्या व त्यात त्यांनी या घोटाळय़ात वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. संगीताने देवयानी यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करण्याचे मान्य केल्यावर तिने तिचा ब्लू व्हिसा देवयानी यांना दिला व नंतर त्यांनी संगीताला पांढरा व्हिसा मिळवून दिला त्यामुळे त्यांचा ब्लू व्हिसा रद्द झाला होता. संगीताने तिच्या पांढऱ्या पासपोर्टवर २४ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यूयॉर्ककडे प्रयाण केले व नंतर ती बेपत्ता झाली, असे जून २०१३ मध्ये ती देवयानी यांच्या घरातून बेपत्ता झाली तेव्हा दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात म्हटले आहे. त्यामुळे संगीताला ब्लू पासपोर्टवर प्रवास करण्यात देवयानी या अडथळा आणत होत्या या दाव्यात तथ्य नाही. संगीताकडे पांढरा पासपोर्ट होता व तो भारतात परत जाण्यास उपयोगाचा नाही हे तिला माहिती असताना तिने रोजगार नियमांचे उल्लंघन केले असे बत्रा यांचे म्हणणे आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०१३ रोजी संगीतावर अटक वॉरंट काढले होते व यात तिचा पती आरोपी क्रमांक दोन होता. त्यामुळे तिचे भारतात परतणे योग्य नव्हते, पण अभियोक्ता प्रीत भरारा यांनी मात्र संगीताला भारतात जायचे होते असे म्हटले आहे. फिलीप रिचर्ड हे दिल्लीतील अमेरिकी दूतावासात कर्मचारी असल्याने संगीताला नेहमीच तिला तीस हजारांचे दोन करार करताना फिलीपच्या माध्यमातून योग्य सल्ला मिळणे शक्य होते. संगीताच्या कुटुंबीयांना अमेरिकेने टी व्हिसा का दिला असा मुद्दाही बत्रा यांनी उपस्थित केला असून, तेथील परराष्ट्र खात्याने आमच्या अधिकारी देवयानी यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला भरण्यास परवानगी दिली, पण अशा स्थितीत त्यांनी संगीताला व तिच्या कुटुंबीयांना टी व्हिसा दिला हा पूर्ण विरोधाभास होता.