भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर यांनी शुक्रवारी येथे अमेरिकी अधिकाऱ्यांची भेट घेऊन राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावरील आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मात्र देवयानी खोब्रागडे यांना कारवाईपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने संरक्षण देण्याच्या मुद्दय़ावर विचार चालू असल्याचे सांगितले.
जयशंकर यांनी खोब्रागडे यांच्या अटकेवर भारताच्या वतीने निषेध नोंदवताना ज्याप्रकारे भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींना येथे आणताना जी पद्धत वापरण्यात आली त्याला आक्षेप घेतला. त्यांचा रोख देवयानी खोब्रागडे यांच्याकडे मोलकरणी असलेल्या संगीता रिचर्ड या दोन दिवसांत भारतातून न्यूयॉर्कला ज्याप्रकारे पोहोचल्या त्यावर होता.
राजशिष्टाचारानुसार आपली अधिकारपत्रे राजकीय कामकाज उपमंत्री वेंडी शेरमन व व्यवस्थापन उपमंत्री पॅट्रिक एफ. केनेडी यांना जयशंकर यांनी सादर केली. दोन्ही मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आल्याचा मुद्दा जयशंकर यांनी मांडला. खोब्रागडे यांची आता संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी दूतावासात बदली करण्यात आली होती. जयशंकर यांनी देवयानी यांच्यावरील आरोप मागे घेण्याची मागणी तर केलीच, पण ज्या पद्धतीने संगीता रिचर्ड यांना भारताचे न्यायिक सार्वभौमत्व डावलून भारतातून न्यूयॉर्कला अवघ्या दोन दिवसांत आणण्यात  आले त्यालाही आक्षेप घेतला.
जयशंकर यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक नाजूक परिस्थितीत असताना राजदूतपदाची सूत्रे घेतली असून, त्यांची निरुपमा राव यांच्या निवृत्तीनंतर नेमणूक झाली आहे. ते आधी चीनमध्ये राजदूत होते. दरम्यान परराष्ट्र विभागाने असे सांगितले, की खोब्रागडे यांना संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासात बदली केल्यानंतर त्यांच्या अधिस्वीकृती कागदपत्रांविषयी आम्ही विचार करीत आहोत. डॉ. खोब्रागडे यांचे नाव संयुक्त राष्ट्रातील आमसभेच्या भारतीय प्रतिनिधिमंडळातील सदस्या म्हणून सप्टेंबरमध्येच अधिसूचित केले होते, असे भारताने म्हटले आहे. त्या प्रकरणी विचार सुरू आहे. परराष्ट्र खात्याच्या उप प्रवक्त्या मारी हार्फ यांनी सांगितले. खोब्रागडे या संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी दूतावासात सल्लागार असल्याची अधिस्वीकृती २६ ऑगस्ट २०१३ रोजी देण्यात आली असून त्यांच्या त्या दर्जाची वैधता ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकी वकील रवि बात्रा यांनी सांगितले, की खोब्रागडे या खरोखर त्या काळात संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी दूतावासाच्या सल्लागार असतील तर अटकेच्या कारवाईमुळे व्हिएन्ना जाहीरनाम्याचे उल्लंघन झाल्याच्या मुद्दय़ावरून अमेरिकेवर खटला भरू शकतात, असे बात्रा यांनी म्हटले
आहे.