भारताच्या न्यूयॉर्कमधील उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांनी व्हिसा अर्जात दिलेल्या माहितीनुसार मोलकरणीस वेतन न दिल्याच्या आरोपाखाली अटक करून त्यांना हातकडय़ा ठोकल्याच्या व अंगझडती घेतल्याच्या प्रकरणी नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासासमोर शुक्रवारी संतप्त निदर्शने करण्यात आली. या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या व भारतीय अधिकाऱ्यांनी प्रक्षोभक भाषणे केली.
दरम्यान, आमच्याकडे नागरिक अमेरिकेचा किंवा इतर देशातला असला तरी सारखीच वागणूक दिली जाते, गरीब-श्रीमंत असा भेद गुन्हय़ांच्या प्रकरणात केला जात नाही, असा दावा न्यूयॉर्क शहराचे महाधिवक्ता रॉन क्युबी यांनी केला. ते म्हणाले, की प्रत्येकालाच गुन्हय़ानंतर क्रूरपणे व उर्मटपणे वागवले जाते. त्यात गरीब-श्रीमंत असा भेद केला जात नाही.