दूतावासातील कर्मचारी त्यांच्या देशातून त्यांच्याबरोबर जे मदतनीस आणि घरकामगार आणतात त्यांच्याबाबत अमेरिकेचे कायदे काय आहेत, हे आम्ही दर वर्षी प्रत्येक देशाला लेखी स्वरूपात कळवीत असतो. त्यामुळे या कायद्यांचा भंग आम्ही सामान्य बाब मानत नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र प्रवक्त्या मॅरी हार्फ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
खोब्रागडे या आरोपमुक्त होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच परराष्ट्र प्रवक्त्या मॅरी हार्फ यांनी स्पष्टपणे ‘‘नाही!’’ असेच सांगितले.
भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आपल्याशी या प्रकरणी बोलणार आहेत, असे विधान केले आहे. ते धुडकावताना हार्फ म्हणाल्या, असे कोणतेही संभाषण नियोजित नाही.
या संपूर्ण प्रकरणात वारंवार संपर्क साधूनही अमेरिकेने भारताला प्रतिसाद दिला नाही, की योग्य तपशील दिला नाही, हा आरोपही हार्फ यांनी फेटाळला. एकदा गुन्हा नोंदला गेला की तपास अडचणीत येऊ नये म्हणून यंत्रणेवर अनेक मर्यादा येतात, असे त्यांनी सांगितले.
संगीता रिचर्ड ही नोव्हेंबर २०१२ मध्ये खोब्रागडे यांच्यासह अमेरिकेत आली होती. पगार व काम यातील विसंगतीमुळे अन्यत्र काम करण्याची परवानगी तिने खोब्रागडे यांच्याकडे मागितली.
त्यांनी ती नाकारल्यानंतर २३ जूनला संगीता त्यांना न सांगता घर सोडून गेली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार भारतीय दूतावासाने अमेरिकेच्या परराष्ट्र कार्यालयाकडे नोंदवली होती. त्यानंतर खोब्रागडे यांनीच तिची फसवणूक केल्याचे अमेरिकन यंत्रणेला आढळल्याने तपास सुरू झाला.
उत्तम खोब्रागडे यांची दडपशाही?
प्रकरण अंगाशी शेकणार, असे दिसताच रिचर्ड हिच्या भारतातील आप्तांवर दडपण आणले गेले, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. त्यानुसार, संगीता हिला मायदेशी परत बोलावून घ्या, असे दडपण संगीता हिच्या पतीवर आणण्यासाठी देवयानी हिच्या वडिलांनी (उत्तम खोब्रागडे यांनी) दोनदा दूरध्वनी केला होता.