भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा अर्जात दिलेल्या माहितीप्रमाणे मोलकरणीला नियमाप्रमाणे वेतन न दिल्याच्या प्रकरणी अमेरिकी न्यायालयात व्यक्तिगतरीत्या उपस्थित राहण्यापासून सूट मिळाली आहे.
दरम्यान, त्यांना संयुक्त राष्ट्रांतील भारतीय दूतावासात बदली केल्यानंतर अधिस्वीकृतीही देण्यात आली आहे. खोब्रागडे यांना १२ डिसेंबर रोजी अटक करून नंतर अडीच लाख डॉलरच्या जामिनावर सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यांना पुढील कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांची बदली संयुक्त राष्ट्रांतील स्थायी दूतावासात करण्यात आली आहे. भारतातील अमेरिकी दूतावासाने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे काम करणाऱ्या व्यक्तींविषयी तसेच त्यांच्या वेतनाबाबत जी माहिती मागवली होती व व्हिसासंबंधी जी माहिती मागवली होती ती देण्यास मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे. ओळखपत्रे परत करण्याची व ही माहिती देण्याची आज अंतिम मुदत होती.

अमेरिकेचे वर्तन शहाणपणाचे नाही- एम. गॉर्डन
 शत्रू देशांच्या अधिकाऱ्यांशीही जसे वर्तन केले जात नाही तसे देवयानी यांच्याशी केले गेले, याप्रकरणी अमेरिकी मार्शल्सची चौकशी करावी व जर त्यांनी गैरकृत्य केले असल्याचे निष्पन्न झाले तर त्यांना शिस्त लावावी,आपण आपल्या अधिकाऱ्यांना आवरले पाहिजे नाहीतर ते जगात आपली इज्जत घालवतील असे अमेरिकी परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी एम. गॉर्डन यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लिहिले आहे.
अमेरिकी सरकार कायद्यानुसार वागले हे खरे असले तरी परराष्ट्र संबंधविषयक व्यक्तीला अशी वागणूक देणे शहाणपणाचे नव्हते असे अमेरिकन युनिव्हर्सिटी कॉलेज ऑप लॉ या संस्थेचे स्टीफन व्लाडेक यांनी म्हटले आहे.

नवीन राजदूत मंगळवारी वॉशिंग्टनला पोहोचणार
भारताचे अमेरिकेतील नवीन राजदूत एस. जयशंकर हे उद्या वॉशिंग्टनला येत असून, देवयानी खोब्रागडे प्रकरणात ते तातडीने लक्ष घालतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. जयशंकर हे यापूर्वी चीनमध्ये राजदूत होते, त्या वेळी भारत-चीन संबंध फारच खालावलेले असताना त्यांनी तेथे राजदूत म्हणून काम केले. ते वॉशिंग्टनमध्ये दाखल होत असले तरी ते त्यांची राजनैतिक अधिकारपत्रे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना सादर करण्यात आठवडा जाणार आहे, कारण सध्या ते त्यांच्या कुटुंबीयांसह हवाई बेटांवर सुटीसाठी गेले आहेत व ते ५ जानेवारीला परत येणार आहेत. जयशंकर यांचा जन्म १९५५ मध्ये झाला असून, ते भारतीय राजनैतिक कामकाजाचे जाणकार असलेले अधिकारी के. सुब्रह्मण्यम यांचे पुत्र, तर इतिहासकार संजय सुब्रह्मण्यम यांचे बंधू आहेत.

ऑनलाइन याचिका
वॉशिंग्टनच्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसमधील भारतीय-अमेरिकी लोकांनी एक ऑनलाइन याचिका सादर केली असून, त्यात देवयानी खोब्रागडे यांची सार्वजनिक मानखंडना केल्याने समुदायाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. खोब्रागडे यांच्यावरील गुन्हेगारी खटला मागे घ्यावा अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.

धक्कादायक व निषेधार्ह- निरुपमा राव
भारताच्या अमेरिकेतील माजी राजदूत निरुपमा राव यांनी सांगितले, की देवयानी खोब्रागडे यांना मिळालेली वागणूक चुकीची, कमालीची धक्कादायक व निषेधार्ह आहे.