News Flash

देवयानी खोब्रागडे प्रकरणातून दोन्ही देशांना खूप शिकायला मिळाले, ओबामा प्रशासन

देवयानी खोब्रागडे यांना १२ डिसेंबर २०१३ ला अमेरिकेत अटक करण्यात आली होती

देवयानी खोब्रागडे यांना १२ डिसेंबर २०१३ ला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती

भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेत व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती लपविल्याच्या प्रकरणामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देशांतील संबंधांवर त्यावेळी परिणाम झाला होता. पण या प्रकरणामुळे दोन्ही देशांना खूप काही शिकायला मिळाले. द्विपक्षीय संबंध आणखी बळकट होण्याच्या दृष्टीने हे अनुभव पुढील काळात निश्चितच उपयोगी ठरणार आहेत, असे अमेरिकेतील मावळत्या ओबामा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दक्षिण आणि मध्य आशियाची जबाबदारी असणाऱ्या अमेरिकेतील परराष्ट्र उपमंत्री निशा देसाई बिस्वाल म्हणाल्या की, मी पदाची जबाबादारी स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांतच हे प्रकरण पुढे आले होते. खरंतर हे प्रकरण दोन्ही देशांसाठी परीक्षा पाहणारेच होते. दोन्ही देशांतील संबंध काही काळासाठी ताणले गेले होते. पण त्याचवेळी हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की त्यामुळे दोन्ही देशांना यातून खूप काही शिकायला मिळाले. दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांना यातून चांगलाच धडा मिळाला. प्रकरण लहान असो की मोठे त्यामध्ये तातडीने लक्ष घातलेच पाहिजे. विषय लहान आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करा, ही वृत्ती उपयोगी नाही. दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांना एकमेकांच्या देशात राहून काम करायचे असते. त्यामुळे तेथील नियम आणि कायदे यांच्या कार्यकक्षेत राहूनच प्रत्येकाला काम करावे लागते, हे दोन्ही देशांना उमगल्याचे निशा देसाई बिस्वाल यांनी सांगितले.

देवयानी खोब्रागडे यांना १२ डिसेंबर २०१३ ला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. देवयानी यांच्यावर त्यांची मोलकरीण संगीता रिचर्ड यांच्याकडून जास्त काम करून घेण्याचा व पगार कमी दिल्याचा आरोप आहे. आरोपपत्रामध्ये देवयानी यांच्यावर मोलकरणीला ठराविक वेतनश्रेणीपेक्षा कमी वेतन दिल्याचा आणि शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भारताने देवयानी यांची अमेरिकेतून बदली करत संयुक्त राष्ट्र संघाच्या मिशनमध्ये सहभागी करून घेतले होते. त्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत. देवयानी खोब्रागडे या १९९९च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 5:29 pm

Web Title: devyani khobragade us obama administration us india relations
Next Stories
1 व्हॉट्सअॅप, फेसबुक डेटा शेअरिंगवरुन सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस
2 अखिलेशने माझे ऐकले नाही तर त्याच्याविरूद्ध लढेन- मुलायमसिंह यादव
3 माजी मंत्र्याने आळवला शशिकलांविरोधात बंडखोरीचा सूर
Just Now!
X