अमेरिकेतील भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेमुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधात चढउतार आले आहेत, हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले वक्तव्य खरे असले, तरी आमचा भर हा दोन्ही देशांतील संबंध पूर्वपदावर आणण्यावर आहे, असे अमेरिकेने शनिवारी स्पष्ट केले. देवयानी खोब्रागडे यांच्या झडतीची  चित्रफीत माध्यमांमध्ये उपलब्ध असल्याच्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
ती व्हिडिओ म्हणजे खोब्रागडे यांची  चित्रफीत नाही. बनावटपणा करून ती व्हिडिओ तयार केली आहे, असे अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या उपप्रवक्तया मारी  हार्फ यांनी नमूद केले.
या व्हिडिओमध्ये सदर महिला तिची पोलिस अंगझडती घेत असताना ओरडताना दिसत आहे. काही वृत्त संकेतस्थळांनी शहानिशा न करता ती टाकली आहेत पण ती खरी नाही, आम्हाला हे अतिशय अडचणीत आणणारे वाटते व हा बेजबाबदारपणा आहे, त्यामुळे ती  चित्रफीत  देवयानी यांची नाही एवढेच आपण सांगत आहोत, असे त्या म्हणाल्या.
या  चित्रफीतीबाबत आम्ही अमेरिकी मार्शल्स सेवेशी बोललो आहोत व त्यांनीही व्हिडिओत दाखवल्यासारख्या पद्धती आम्ही वापरत नाही असे स्पष्ट केले आहे. आपण स्वत: ती व्हिडिओ पाहिलेली नाही पण आम्ही अशा पद्धतीने तपास करीत नाही, असे त्या म्हणाल्या.
जेव्हा तुम्ही एखाद्या बाबीवर खेद व्यक्त करण्यात आल्याचे ऐकता तेव्हा त्याचा अर्थ सगळे सुरळीत चाललेले नाही असा होतो. देवयानी यांच्या अटक प्रकरणामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधात चढउतार आले, हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विधान आम्हाला मान्य आहे, असे हार्फ यांनी सांगितले.
भारताने नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाच्या बाहेर १५० पोलिस तैनात केले त्या निर्णयाचे अमेरिका स्वागत करते, असे सांगून त्या म्हणाल्या, की भारताच्या परराष्ट्र खात्याने केलेल्या वक्तव्यांचे आम्ही स्वागत करतो.
अमेरिकन सेंटरमध्ये मनाई
भारतातील अमेरिकी दूतावासाने अमेरिकन सेंटर येथे परवानगीशिवाय चित्रपट दाखवू नये असा आदेश भारताने दिला असून येत्या वीस जानेवारीपर्यंत या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अंतिम मुदत दिली आहे. न्यूयॉर्क येथे देवयानी खोब्रागडे यांना अटक करून त्यांना हातकडय़ा ठोकल्या व अंगझडती घेण्यात आली, त्याप्रकरणी अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले.अमेरिकन सेंटरमध्ये नेहमी चित्रपट दाखवले जातात त्यासाठी प्रेक्षकांना निमंत्रित केले जाते, यात कुठलीही परवानगी घेतली जात नाही त्यामुळे परवानगीशिवाय चित्रपट दाखवू नये असे भारताने अमेरिकी दूतावासाला पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
सूत्रांनी सांगितले, की अमेरिकी सेंटरला कडक शब्दात ही नोटीस देण्यात आली असून अटीचे पालन करण्याकरिता अमेरिकी दूतावासाला २० जानेवारीची मुदत दिली आहे.  या अटीचे पालन केले नाही, तर अमेरिकन सेंटरला २१ जानेवारीपासून चित्रपट दाखवण्यास प्रतिबंध केला जाईल, असेही सांगण्यात आले.